पोलीस आयुक्तालय इमारतीचे काम पूर्ण

By Admin | Published: December 26, 2015 01:22 AM2015-12-26T01:22:57+5:302015-12-26T01:22:57+5:30

काही वर्षांपासून बांधकाम सुरू असलेल्या मुंबई पोलीस मुख्यालयातील विस्तारित पोलीस आयुक्त कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम अखेर पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Completed the work of the Police Commissionerate | पोलीस आयुक्तालय इमारतीचे काम पूर्ण

पोलीस आयुक्तालय इमारतीचे काम पूर्ण

googlenewsNext

मुंबई : काही वर्षांपासून बांधकाम सुरू असलेल्या मुंबई पोलीस मुख्यालयातील विस्तारित पोलीस आयुक्त कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम अखेर पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या सोमवारी या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
मुंबई पोलीस दलातील वाढत चाललेले प्रशासकीय दैनंदिन कामकाज, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय प्रश्न हे सगळे कामकाज सुरळीत होणे या नव्या इमारतीमुळे शक्य होणार आहे. मुंबई पोलीस मुख्यालयाच्या आवारात असलेल्या या नवीन आयुक्त कार्यालय इमारतीचे बांधकाम २०११पासून सुरू केले होते. अखेर गेल्या ४ वर्षांमध्ये या सहा मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण केले. इमारतीच्या तळमजल्यावर मुंबईकरांच्या सेवेसाठी आधुनिक नागरिक सुविधा केंद्र तयार करण्यात आले आहे. तसेच या मजल्यावर पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी व्यायामशाळा आणि कॅन्टीनदेखील असणार आहे.
इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आयुक्तालयाचे प्रशासकीय कार्यालय असेल. तर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या महत्त्वाच्या कार्यालयांसाठी इमारतीमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर कार्यालये बनविण्यात आली आहेत. मुंबईतील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेला मुंबई पोलीस मुख्य नियंत्रण कक्ष आणि सीसीटीव्ही कमांड सेंटर या इमारतीच्या ५व्या मजल्यावर असेल. ६व्या मजल्यावर सहपोलीस आयुक्त प्रशासन यांच्या देखरेखीखाली पोलीस कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी कक्ष आणि
एक सभागृह तयार करण्यात
आल्याचे पोलीस प्रवक्ते पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

प्रमुख उपस्थिती
२८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याप्रसंगी मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, राम शिंदे, खा. अरविंद सावंत, आ. राज पुरोहित, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, अपर मुख्य सचिव गृह के.पी. बक्षी, राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, गृहनिर्माण महामंडळाचे पोलीस महासंचालक सतीश माथुर, मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Completed the work of the Police Commissionerate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.