दोन वर्षांत अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणार - गिरीश महाजन
By admin | Published: August 31, 2016 05:15 PM2016-08-31T17:15:55+5:302016-08-31T17:25:50+5:30
जलसंपदा विभागात एकही नवीन काम काढणार नसून येत्या दोन वर्षात अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
Next
>ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 31 - जलसंपदा विभागात एकही नवीन काम काढणार नसून येत्या दोन वर्षांत अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
जलसंपदा विभागात प्रचंड अनियमितता आहे. हे सारे मागच्या सरकारचे पाप असून या खात्यामुळेच सरकार बदलले आहे, असा आरोप करत गिरीश महाजन यांनी येत्या दोन वर्षांत अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणार असल्याची ग्वाही दिली आहे.
राज्यातील धरणं केव्हाही फुटू शकतील, अशी परिस्थिती नाही. टेमघर धरणाला गळती लागली असून, त्याची चौकशी सुरू आहे. टेमघरसाठी शंभर कोटींचं टेंडर काढलंय, पुढच्या महिन्यात दुरुस्तीला सुरुवात होऊन गळती थांबेल, सरकार याबाबत गंभीर आहे. टेमघरची परिस्थिती गंभीर आहे. ज्यांनी चुका केल्या आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तर दुसऱ्या धरणांतील गळती अतिशय छोटी आहे. गेल्या 6 महिन्यांपासून काम सुरू असून पावसामुळे काम थांबविण्यात आले आहे. पावसानंतर काम सुरू करून गळती थांबवली जाईल, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले.
गोसेखुर्दच्या प्रकल्पात अनियमितता आढळल्यानं निविदा रद्द केली आहे. तसेच यासंदर्भात एसीबीकडून चौकशी सुरू आहे. कोकणातील बारा, नाशिकचा किकवी यांच्या कामात गंभीर अनियमितता आहे. कोकणात बारा पैकी दोन प्रकल्पांची चौकशी झाली आहे. अधिका-याला अटक झाली असून, ठेकेदार जेल मध्ये आहे. शेवटचं आरोपपत्र दाखल करण्याचे काम सुरू असून इतर दोषींवरही कारवाई करण्यात येईल, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.
राज्यातील धरणसाठ्यांची परिस्थिती गेल्या वर्षीपेक्षा उत्तम आहे. तर मराठवाडय़ासह काही भागात पाऊस कमी असून जायकवाडीत चांगले पाणी आहे. सध्या जायकवाडीत ७६ टीएमसी पाणी आहे. सदर भागातील पीकही अनुकूल आहेत, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.