नवी मुंबई, ठाणे, पालघरमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 04:38 AM2018-08-10T04:38:44+5:302018-08-10T04:39:02+5:30
शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणेंसह आतापर्यंतच्या आंदोलनात बळी पडलेल्या सहा हुतात्मांना श्रद्धांजली वाहून ठिकठिकाणी मुक निदर्शने केली.
ठाणे : मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदमधून ठाणे जिल्हा शाखेने माघार घेतली असली तरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलकांनी काश्मीरमध्ये शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणेंसह आतापर्यंतच्या आंदोलनात बळी पडलेल्या सहा हुतात्मांना श्रद्धांजली वाहून ठिकठिकाणी मुक निदर्शने केली. यावेळी अनेक ठिकाणी सरकारचा निषेधही केला. म्हारळ येथे कल्याण-नगर मार्गावरील अर्ध्यातासाचा रास्तोरोको वगळता कुठेही आंदोलन झाले नाही.
अलिबाग : रायगड जिल्ह्यात अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बंदच्या निमित्ताने कोणावरही जबरदस्ती करण्यात आली नव्हती, मात्र जिल्ह्यातील अनेक मोठ्या बाजारपेठा व्यापाऱ्यांनी स्वेच्छेनेच बंद ठेवून समर्थन दर्शवले. परिणामी जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडले नाहीत. मात्र, गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव, महाड आणि पोलादपूर येथे रास्ता रोको करण्यात आल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दुपारी एकच्या सुमारास ती पूर्ववत झाली. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील सर्व व्यावसायिकांनी बंदला पाठिंबा देऊन व्यवसाय बंद ठेवले.
पालघर : बंदच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी एसटीने खबरदारीचा उपाय म्हणून लांब पल्ल्याच्या अनेक फेºया रद्द केल्या होत्या. या विभागातील ८ आगारातून २२८ फेºया रद्द झाल्याने ८९,३,०४४ इतक्या रूपयांचे एसटीचे नुकसान झाले. जिल्हयामध्ये सर्वत्र शांतता होती. विरारमध्ये फक्त काही आंदोलक आणि रिक्षा चालक यांच्यात बाचाबाची झाली.
नवी मुंबई : बंदमधून नवी मुंबई शहर वगळण्यात आले होते. कोपरखैरणेचा काही भाग वगळता दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू होते. एपीएमसीच्या पाचही बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. सायन-पनवेल महामार्गावर शुकशुकाट होता.
>आंदोलनाला प्रतिबंध घालण्यासाठी याचिका
मुंबई : राज्यभरात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला प्रतिबंध घालण्यात यावा व हिंसाचार करणाºयांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका शेतकरी द्वारकानाथ पाटील यांनी उच्च न्यायालयात दखल केली आहे़ यावर १३ आॅगस्ट रोजी सुनावणी होणार आहे़