शाळा बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद
By admin | Published: July 5, 2016 01:35 AM2016-07-05T01:35:40+5:302016-07-05T01:35:40+5:30
राज्यातील सर्व खाजगी शिक्षण संस्थांनी सोमवारी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनाला राज्यातून संमिश्र प्रतिसाद मिळाला. याउलट मुंबईतील संघटनांनी मात्र महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती
मुंबई : राज्यातील सर्व खाजगी शिक्षण संस्थांनी सोमवारी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनाला राज्यातून संमिश्र प्रतिसाद मिळाला. याउलट मुंबईतील संघटनांनी मात्र महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीच्या मागण्यांना नैतिक पाठिंबा देत, आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसले.
आंदोलने करूनही शिक्षणमंत्री बैठक घेत नसल्याची कृती समितीची तक्रार आहे. त्यामुळे समितीने सोमवारी शाळा बंदचे आवाहन केले होते. मात्र मुंबईतील प्रमुख संघटना असलेल्या शिक्षक परिषद आणि शिक्षक भारती यांनी शाळा बंद आंदोलनात सहभाग घेतला नाही. याबाबत विचारणा केली असता, शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे म्हणाले की, समितीच्या मागण्या रास्त आहेत. मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान करून बंदमध्ये सामील होता येणार नाही. त्यामुळे शिक्षक परिषद शाळा बंद आंदोलनात सामील झालेली नाही. शिक्षक भारतीचे अशोक बेलसरे म्हणाले की, विद्यार्थ्यांना वेठीस धरून केलेल्या कोणत्याही आंदोलनाला संघटना पाठिंबा देऊ शकत नाही. कृती समितीने केलेल्या मागण्यांना संघटनेने पाठिंबा दिला आहे. मात्र अशा प्रकारे शाळा
बंद ठेवून संघटना आंदोलन करणार नाही. (प्रतिनिधी)
१२ दिवसांची मुदत
राज्यातील भारतीय जनता पार्टीशी संलग्नित संस्थाचालकांनी बंदमध्ये सहभाग घेतला नाही. राज्यभर मिळालेल्या संमिश्र प्रतिसादानंतर सरकारला १२ दिवसांची मुदत देण्यात येत आहे. यादरम्यान शिक्षणमंत्र्यांनी बैठक घेतली नाही, तर १६ जुलैपासून शाळा बेमुदत बंद ठेवण्यात येतील.
- मनोज पाटील,
कृती समितीचे पदाधिकारी