पुन्हा समग्र सेतुमाधवराव पगडी साहित्य!
By admin | Published: May 28, 2017 12:13 AM2017-05-28T00:13:21+5:302017-05-28T00:13:21+5:30
पुस्तक चांगलं चाललंय असं म्हटलं तरी बरं वाटण्याचे सध्या दिवस आहेत. पुस्तकाची आवृत्ती संपली असं कळलं की ‘‘खरंच का?’’ असा प्रश्न मनात येतोच येतो. तर दुसरी आवृत्ती म्हणजे कमालच असं वाटतंच वाटतं.
- रविप्रकाश कुलकर्णी
पुस्तक चांगलं चाललंय असं म्हटलं तरी बरं वाटण्याचे सध्या दिवस आहेत. पुस्तकाची आवृत्ती संपली असं कळलं की ‘‘खरंच का?’’ असा प्रश्न मनात येतोच येतो. तर दुसरी आवृत्ती म्हणजे कमालच असं वाटतंच वाटतं.
अशावेळी समग्र सेतुमाधवराव पगडीच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभाचं आमंत्रण आलं तेव्हा मनात आलं, सगळंच काही अंधारलेलं नाही. उत्तम कलाकृतीला दाद मिळतेच. विशेष म्हणजे हे सर्व प्रकाशनाचं काम मराठी तेलंगण राज्य साहित्य परिषदेनी केलेलं आहे!
समग्र सेतुमाधवराव पगडी प्रकल्पाची धुरा पाच वर्षांपूर्वी द. पं. जोशी आणि त्यांचे साहित्य परिषदेतील सहकारी यांनी पार पाडली. त्याचा प्रकाशन समारंभ मुंबईत झाला होता. तर ज्ञानाचा हा भलामोठा व्याप तेव्हाच्या कार्यवाह असलेल्या डॉ. विद्या देवधर (आता द. पं. जोशींच्या निधनानंतर त्या अध्यक्ष आहेत.) यांनी यशस्वी करून दाखवलेला आहे. आणखी एक बदल सांगायला हवा. द. पं. जोशी यांच्या कार्यकाळात मराठी साहित्य परिषद (आंध्र प्रदेश) ही विद्या देवधर यांच्या कार्यकाळात आता तेलंगण राज्यात आहे.
महाराष्ट्राच्या बाहेरदेखील मराठीच्या उत्कर्षासाठी, संवर्धनासाठी अथक प्रयत्न चाललेले आहेत. याकडे ‘मराठी मराठी’ असं महाराष्ट्रात म्हणणाऱ्यांचे लक्ष जावे यासाठी मुद्दाम त्यांच्या कामगिरीकडे लक्ष वेधतो...
समग्र सेतुमाधवराव पगडी - दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन पुण्यात आहे. त्यासाठी अगत्याचे आमंत्रण या प्रकल्पाचे मुद्रक आनंद लाटकर यांनी दिले खरे. पण सध्याचा सुट्टीचा मोसम, गाड्यांची गर्दी आणि सर्वांत बिकट म्हणजे अति उन्हाळा त्यामुळे जावे की न जावे, असा प्रश्न मनात आला.
पण त्याचवेळी सेतुमाधवराव पगडींची आठवण झाली. वयोपरत्वे तेदेखील थकत. लिहिण्या-वाचण्याचा कंटाळा कधी कधी येई. थांबवावं सगळं असं त्यांच्या मनात येई.
पण हे सगळं क्षणभरच. कारण लगेच त्यांच्या मनात येई त्या तिकडे गिरगावात भटवाडीत आपलं वार्धक्य आणि क्षीण होत चाललेली प्रकृती याचा बाऊ न करता तो ज्ञानसूर्य गांधी चरित्र लिहिण्याची उमेद बाळगून साधनांची जुळवाजुळव करतो आहे आणि त्याच्यापुढे आपण आपल्या प्रकृतीची काय टिमकी वाजवायची? त्यांचा आळस आणि निराशा त्या क्षणाला जायची आणि ते परत कामाला लागत. हे ज्ञानसूर्य म्हणजे परखड आणि तर्कट असे प्रा. न. र. फाटक, ही आठवण खुद्द सेतुमाधवरावांनीच एकदा मला सांगितलेली. तेव्हा त्यांच्या समग्र वाङ्मय प्रकाशनाला आपण काहीतरी कारण पुढे करणं नव्हे मनात येणं याचीदेखील खरंच सांगतो - लाज वाटली!
अर्थात, प्रकाशन समारंभाला गेलोच. पुण्याचं पत्रकार संघाचं सभागृह पूर्ण भरलेलं होतं. असा अनुभव हल्ली येत नाही, असं तेव्हा कुणीतरी म्हटलंदेखील.
पण ही किमया होती सेतुमाधवराव पगडी यांच्या रसपूर्ण साहित्याची.
लेखकाचं समग्र साहित्य प्रकाशित होणं ही मराठी साहित्य जगतात दुर्मीळ गोष्ट आहे. त्यात पुन्हा त्याची दुसरी आवृत्ती
निघणं ही तर जवळ जवळ अशक्यप्राय
वाटावी अशी गोष्ट. समग्र सेतुमाधवराव
पगडी साहित्याचं म्हणूनदेखील वेगळेपण ठसावं.