घराणेशाहीला संमिश्र यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 06:00 AM2019-05-25T06:00:03+5:302019-05-25T06:00:24+5:30
मुंडे, विखे, मंडलिक, गावितांची दुसरी पिढी पोहोचली लोकसभेत; भुजबळ, महाडिक, पाटील यांचे वारसदार मात्र अडकले
मुंबई : राजकारणातील घराणेशाही चालविणाऱ्या नंतरच्या पिढीला लोकसभा निवडणुकीत संमिश्र यश मिळाले. काहींचे वारसदार आपटले तर काहींनी परंपरा कायम ठेवली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराण्यात पहिल्यांदाच पराभव झाला.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांचा नाशिक मतदारसंघात दारुण पराभव झाला. माजी मंत्री दिवंगत ए. टी.पवार यांच्या स्रुषा डॉ. भारती पवार (भाजप) दिंडोरीत जिंकल्या. माजी मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या स्रुषा रक्षा खडसे दुसऱ्यांदा रावेरमधून लोकसभेवर पोहोचल्या. माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे पुत्र आणि विद्यमान आमदार कुणाल पाटील (काँग्रेस) यांचा धुळ्यात दारूण पराभव झाला. त्याचवेळी माजी मंत्री आणि भाजपचे विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉ. हिना नंदुरबारमधून पुन्हा लोकसभेवर निवडून गेल्या. भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या डॉ. प्रीतम यांनी बीडचा गड राखला. एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी तिसºयांदा लोकसभा गाठली पण त्यांचे भाचे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मावळमधून शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्याकडून पराभूत झाले.
प्रदेश काँग्रेसच्या माजी अध्यक्ष दिवंगत प्रभा राव यांच्या कन्या चारूलता राव टोकस वर्धेत हरल्या. बुलडाण्यामध्ये पराभूत झालेले राष्ट्रवादीचे उमदेवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे वडील भास्करराव शिंगणे हे आमदार होते.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय हे अहमदनगरमधून जिंकले. कोल्हापुरातील दिग्गज नेते महादेवराव महाडिक यांचे पुतणे आणि कोल्हापूरचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्याकडून पराभूत झाले. संजय हे माजी खासदार दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र आहेत. बाजूच्या हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना पराभूत करणारे धैर्यशील माने हे माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र आहेत. मुंबईतून दुसºयांदा जिंकलेल्या भाजपच्या पूनम महाजन या दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत. त्यांनी माजी खासदार व अभिनेते सुनील दत्त यांच्या कन्या प्रिया दत्त यांचा पराभव केला. मात्र, माजी केंद्रीय मंत्री दिवंगत मुरली देवरा यांचे पुत्र मिलिंद देवरा पराभूत झाले. सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे दुसºयादा कल्याणमधून लोकसभेवर पोहोचले.
पक्षांतर करणाºयांसाठी ‘कही खुशी कही गम’
1लोकसभा निवडणुकीच्या आधी पक्षांतर करून उमेदवारी मिळविलेले काही उमेदवार पडले तर काही जिंकले. डॉ.सुजय विखे यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे कमळ हाती घेतले आणि ते मोठ्या फरकाने जिंकले. सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अनपेक्षितपणे भाजपची उमेदवारी माढामध्ये घेतली आणि राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर भाजपने कब्जा केला. शिवसेनेचे आमदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी निवडणुकीच्या काही दिवस आधी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसची उमेदवारी मिळवित भाजपचे दिग्गज उमेदवार व केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांना पराभूत केले.
2पश्चिम महाराष्ट्रातील शिरुर मतदारसंघात जिंकलेले राष्ट्रवादीचे डॉ.अमोल कोल्हे यांनी काही दिवस आधी शिवबंधन तोडून घड्याळ हाती घेतले आणि शिवसेनेचे दिग्गज शिवाजीराव अढ्याळराव पाटील यांना पराभवाची धूळ चारली. दिंडोरीमध्ये राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये गेलेल्या डॉ.भारती पवार यांनी राष्ट्रवादीचा पराभव करून दिल्ली गाठली.
3नांदेडमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा पराभव करून जायंट किलर ठरलेले प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेनेतून भाजपत प्रवेश
केला होता.
4भाजपचे खासदार असूनही युतीच्या समन्वयातून पालघरमध्ये डॉ.राजेंद्र गावित यांनी ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश केला आणि ते निवडूनही आले. शिवसेना, भाजप आणि काँग्रेस असा प्रवास केलेले सुभाष वानखेडे यांना हिंगोलीत पराभवाचा सामना करावा लागला.
नवे चेहरे संसदेत
भाजपचे १०, शिवसेनेचे चार, राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेस, एमआयएम व आघाडी पुरस्कृत अपक्ष प्रत्येकी एक असे १९ खासदार पहिल्यांदाच लोकसभेत पोहोचले आहेत. भाजपच्या या खासदारांमध्ये सुजय विखे पाटील, सुनील मेंढे, भारती पवार, उन्मेष पाटील, सुधाकर श्रृंगारे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, मनोज कोटक, प्रताप पाटील चिखलीकर, गिरीश बापट, जयसिद्धेश्वर स्वामी यांचा समावेश आहे. शिवसेनेचे धैर्यशील माने, संजय मंडलिक, ओमराजे निंबाळकर, हेमंत पाटील यांनी पहिल्यांदाच लोकसभा गाठली आहे. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, डॉ. अमोल कोल्हे, काँग्रेसचे सुरेश धानोरकर, आघाडी पुरस्कृत अपक्ष नवनीतकौर राणा आणि एमआयएमचे इम्तियाज जलिल हे पहिल्यांदाच लोकसभेत प्रवेश करीत आहेत.
भाजप-शिवसेना युतीने अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव ९ पैकी ८ जागा जिंकल्या. अनुसूचित जातींसाठी राखीव ५ पैकी ४ जागा युतीने तर एक आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवाराने जिंकली. अनुसूचि जातींसाठी राखीव जागांपैकी कृपाल तुमाने (रामटेक), सदाशिव लोखंडे (शिर्डी) या दोन जागांवर शिवसेनेने कब्जा केला. सुधाकर श्रृंगारे (लातूर) आणि जय सिद्धेश्वर स्वामी (सोलापूर) या दोन जागा भाजपने जिंकल्या. अमरावतीची जागा अपक्ष नवनीत कौर राणा यांनी जिंकली. अनुसूचित जमातींसाठी राखीव चारही जागा युतीने जिंकल्या. त्यात अशोक नेते (गडचिरोली), डॉ. हिना गावित (नंदुरबार) व डॉ.भारती पवार (दिंडोरी) या तीन जागा भाजपने जिंकल्या. शिवसेनेचे राजेंद्र गावित पालघरमधून विजयी झाले.
राज्यात ८ महिला खासदार निवडून आल्या. त्यात सर्वाधिक भाजपच्या आहेत. त्यात पूनम महाजन, डॉ. प्रीतम मुंडे, डॉ.हिना गावित, रक्षा खडसे, डॉ.भारती पवार, शिवसेनेच्या भावना गवळी, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, आघाडी पुरस्कृत अपक्ष नवनीत कौर राणा यांचा समावेश आहे.
राज्यातून ८ डॉक्टर खासदार दिल्लीत पोहोचले आहेत. त्यात, डॉ.सुभाष भामरे (कर्करोग तज्ज्ञ), डॉ.श्रीकांत शिंदे (एमएस आर्थो.) डॉ.हिना गावित (एमडी मेडिसीन), डॉ.प्रीतम मुंडे (एमडी), डॉ.सुजय विखे पाटील (एमडी न्युरो सर्जरी), डॉ.अमोल कोल्हे (एमबीबीएस) आणि डॉ.भारती पवार (एमबीबीएस) यांचा समावेश आहे.