अद्ययावत संगणक शिक्षण सुविधांसाठी भरीव तरतूद
By Admin | Published: March 4, 2017 03:04 AM2017-03-04T03:04:57+5:302017-03-04T03:04:57+5:30
रोहा अष्टमी नगरपरिषदेचा सन २०१७-१८ चा अर्थसंकल्प नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी सादर केला
रोहा : रोहा अष्टमी नगरपरिषदेचा सन २०१७-१८ चा अर्थसंकल्प नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी सादर केला. ३१ कोटी ७९ लाख ४७ हजार रु पये उत्पन्नाचा आणि ३१ कोटी ७६ लाख ४५ हजार ५०० रुपये खर्चाचा आणि ३ लाख १ हजार ५०० रु पयांचा शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. अद्ययावत संगणक शिक्षण सुविधांसाठी पंचवीस लाखांची भरीव तरतूद करण्यात आली आहे.
रोहा नगरपरिषद शिक्षण मंडळ बरखास्त होऊन त्याचा नगरपरिषद विषय समित्यांमध्ये समावेश केल्याने नगरपरिषदेच्या शहरातील सर्व शाळा आता नगरपरिषदेच्या अधिपत्याखाली आल्या आहेत. यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण विभागाबाबत तरतूद होणे अपेक्षित होते. त्यानुसार प्राथमिक विभागाच्या ई - लर्निंग सुविधेकरिता, माध्यमिक विभागाकरिता, संगणक प्रशिक्षणाकरिता तरतूद करण्यात आली आहे. यामुळे नगरपरिषद शाळांतील विद्यार्थ्यांनाही अद्ययावत शिक्षण मिळणार आहे.
रोहा अष्टमी नगरपालिकेची अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाची विशेष सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांच्या अध्यक्षतेखाली १६ फेब्रुवारी रोजी सकाळी नगरपालिकेच्या द.ग.तटकरे सभागृहामध्ये घेण्यात आली. त्यातील तरतुदींची अधिकृत माहिती ३ मार्चला शुक्रवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली. या सभेला उपनगराध्यक्षा शिल्पा धोत्रे, नगरपालिका मुख्याधिकारी प्रकाश पाटील, गटनेते महेंद्र दिवेकर, सभापती समीर सकपाळ, सभापती रिदवाना शेटे, सभापती पूर्वा मोहिते, सभापती महेश कोल्हटकर, नगरसेवक अहमद दर्जी, महेंद्र गुजर, जुबेर चोगले, आफरिन रोगे, नगरसेविका सारिका पायगुडे, नेहा पिंपळे, सुजाता चाळके, गीता पडवळ, स्नेहा अंबरे, समीक्षा बामणे, स्वीकृत नगरसेवक सुभाष राजे, महंमद डबीर, आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
>मोठ्या व्यवसायात करवाढ
या अर्थसंकल्पात दारूची दुकाने व मोठे हॉटेल व्यावसायिक यामध्ये कर दरवाढ केली असून घरपट्टी व पाणीपट्टी करात कोणतीही कर दरवाढ न करता तशीच कायम ठेवण्यात आली आहे. अर्थसंकल्प सभेपुढे सादर झाल्यानंतर त्यावरील चर्चेमध्ये सर्व नगरसेवकांनी भाग घेतला होता. रोहा नगर पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतरची ही पहिली सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली
>शिक्षणासाठी
विशेष तरतूद
६ लाख : प्राथमिक विभाग ई-लर्निंग सुविधा
३ लाख : माध्यमिक विभागाकरिता
१० लाख : प्राथमिक शाळांतील संगणक प्रशिक्षण
६ लाख : माध्यमिक शाळांतील संगणक प्रशिक्षण