संगणकतज्ज्ञाचीही घेणार मदत

By Admin | Published: September 6, 2015 01:28 AM2015-09-06T01:28:05+5:302015-09-06T01:28:05+5:30

शीनाला ठार केल्यानंतर इंद्राणीने शीनाच्या नावाने बोगस ई-मेल अकाउंट सुरू केले होते. या अकाउंटवरून इंद्राणी स्वत: इतरांना मेल करत होती. शीना जिवंत आहे, हे भासवण्यासाठी

Computer help help | संगणकतज्ज्ञाचीही घेणार मदत

संगणकतज्ज्ञाचीही घेणार मदत

googlenewsNext

मुंबई : शीनाला ठार केल्यानंतर इंद्राणीने शीनाच्या नावाने बोगस ई-मेल अकाउंट सुरू केले होते. या अकाउंटवरून इंद्राणी स्वत: इतरांना मेल करत होती. शीना जिवंत आहे, हे भासवण्यासाठी इंद्राणी हे सर्व करत होती. या अकाउंटवरून कोणा-कोणाला मेल करण्यात आले आहेत, याचा तपशील घ्यायचा आहे. यासाठी एका संगणक तज्ज्ञाची मदत घ्यावी लागणार आहे.
शीना राहत असलेल्या घरमालकाला, तिचे निधन झाल्यानंतरही घरभाडे दिले जात होते. तसेच इंद्राणीकडे १४ के्रडिट कार्ड्स आहेत. तिने ब्रिटनपर्यंत पैशांची देवाणघेवाण केली आहे. या सर्व व्यवहारांची माहिती एकत्र करायची आहे. त्यामुळे आरोपींच्या कोठडीत वाढ करावी, अशी मागणी अ‍ॅड. राठोड यांनी केली. अ‍ॅड. राठोड यांच्या युक्तिवादाला इंद्राणी, खन्ना व रायच्या वकिलांनी विरोध केला. गेले १२ दिवस इंद्राणी पोलीस कोठडीत आहे. ती तपासात संपूर्ण सहकार्य करीत आहे. २०० तास तिची चौकशी झाली आहे. त्यातूनही पोलीस कोठडी वाढवून मिळविण्यासाठी सरकारी पक्षाने सादर केलेले मुद्दे जुनेच आहेत; तसेच पोलिसांनी या प्रकरणी मीडिया ट्रायल चालवली आहे. तेव्हा इंद्राणीच्या कोठडीत वाढ करू नये, असा दावा अ‍ॅड. मंगला यांनी केला. मात्र हे प्रकरण गंभीर असून, यामध्ये अजून तपासाची आवश्यकता असल्याचे नमूद करीत न्यायालयाने या तिन्ही संशयित आरोपींच्या कोठडीत वाढ केली. त्यानंतर अ‍ॅड. मंगला यांनी इंद्राणीशी पोलिसांसमक्ष, पण पोलीस काही अंतरावर राहतील, अशा भेटीस परवानगी द्यावी, अशी विनंती केली. न्यायालयाने ती मान्य केली.

कोर्टातल्या खुर्च्या हटवल्या...
इंद्राणीच्या सुनावणीसाठी अतिरिक्त महानगर दंडाधिकारी चंदगडे यांच्या कोर्टातल्या खुर्च्या काढण्यात आल्या होत्या. एखाद्या अतिरेक्याला हजर करावा, असा कडक बंदोबस्त पोलिसांनी न्यायालयात व कोर्टरूममध्ये ठेवला होता. इंद्राणी व इतर संशयित आरोपींना आणण्याआधी पोलिसांनी न्यायाधीशांसमोरील भाग मोकळा केला. त्यानंतर आरोपींना कोर्टरूममध्ये आणण्यात आले. केवळ वकिलांना बसण्यासाठी खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे पोलीस आणि अन्य खटल्यांसाठी न्यायालयात आलेल्या अशिलांना ही सुनावणी संपेपर्यंत दीड तास कोर्टरूममध्ये ताटकळत उभे राहावे लागले. महत्त्वाचे म्हणजे, न्यायाधीशांनी कोठडीची वाढ करण्याची कारणे नमूद करताना त्यांच्या बाजूलाच असलेल्या स्टेनोला ऐकू जाईल एवढ्या हळू आवाजात सांगितले; आणि त्यानंतर कोठडी वाढवल्याचे मात्र मोठ्या आवाजात जाहीर करण्यात आले.

इंद्राणीच्या चेहऱ्याला सूज
इंद्राणीने पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता व पूर्ण चेहरा ओढणीने झाकला होता. सुनावणी झाल्यानंतर कोर्टरूमध्येच तिने ओढणी थोडी वर करून आपल्या वकिलाला कागदपत्रावर स्वाक्षरी हवी आहे का? असे विचारले. त्या वेळी तिच्या चेहऱ्यावर सूज असल्याचे दिसून आले. तर खन्ना व रॉयच्या चेहऱ्याला काळा कपडा बांधण्यात आला होता. यापैकी एकाने जीन्स व टी-शर्ट घातला होता आणि दुसऱ्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट व पॅन्ट घातली होती. या तिघांचीही सर्वप्रथम न्यायालयाने हजेरी घेतली व त्यानंतर सुनावणीला सुरुवात झाली.

रिबेरो यांचे हायकोर्टाला पत्र
शीना प्रकरणात मीडिया ट्रायल सुरू आहे़ याच्याशी संबंधित अनेक वृत्त प्रसारित होत आहेत. हे गैर आहे़ त्यामुळे न्यायालयाने यात हस्तक्षेप करावा़ तसेच मीडियाला शीना प्रकरणाबाबतचे वृत्त प्रसारीत करण्यापासून निर्बंध घालावेत, अशी मागणी करणारे पत्र सुपर कॉप ज्युलिओ रिबेरो यांनी उच्च न्यायालयाला लिहिले आहे़

Web Title: Computer help help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.