संगणकीय मराठीतील उपक्रम सुरू करणार

By admin | Published: February 24, 2016 01:39 AM2016-02-24T01:39:28+5:302016-02-24T01:39:28+5:30

मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन करण्याच्या दृष्टीने आगामी काळात संगणकीय मराठी, दलित ग्रामीण शब्दकोशांच्या पुढील आवृत्ती व सूची, शेतीकोश, परिभाषा कोश यांची निर्मिती करण्यात

Computerized Marathi programs will be started | संगणकीय मराठीतील उपक्रम सुरू करणार

संगणकीय मराठीतील उपक्रम सुरू करणार

Next

मुंबई : मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन करण्याच्या दृष्टीने आगामी काळात संगणकीय मराठी, दलित ग्रामीण शब्दकोशांच्या पुढील आवृत्ती व सूची, शेतीकोश, परिभाषा कोश यांची निर्मिती करण्यात येणार असून, बोली भाषेतील नाट्यस्पर्धा आयोजन करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, तसेच अमराठी भाषिकांमध्ये मराठी भाषेचे महत्त्व वाढविण्यासाठी भाषेमध्ये संगीताचा वापर करण्यात येणार आहे.
राज्य मराठी विकास संस्थेच्या नवनिर्वाचित नियामक मंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषामंत्री विनोद तावडे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीबाबत सांगताना, मराठी भाषामंत्री तावडे यांनी सांगितले की, ‘विकिपिडियाच्या धर्तीवर संगणकीय मराठी भाषेचा विकास करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील बळीराजाच्या माहितीसाठी शेतीकोश तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.’ त्याच पद्धतीने मराठीतील देवनागरी आणि मोडी लिपीचे प्रशिक्षण देण्याचे कार्यक्रम सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले. राज्य मराठी विकास संस्थेंतर्गत होणाऱ्या भविष्यातील प्रकल्पासाठी मराठी भाषामंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती स्थापन करण्यात येणार आहे.
या संस्थेंतर्गत मराठी संकेतस्थळाची स्पर्धा, मराठी ग्रंथ सूचीमाला वस्त्रनिर्मिती माहिती कोश, वैज्ञानिक पुस्तकांचा अनुवाद आदी प्रकल्प अग्रक्रमाने हाती घेण्यात येणार आहेत, तसेच उच्च न्यायालयाच्या कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून, या संदर्भात मुख्यमंत्री लवकरच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांशी चर्चा करणार आहेत, असेही तावडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

भाषा समृद्धीसाठी प्रयत्न होणार
मराठी भाषा जगली पाहिजे, ती सर्वमान्य झाली पाहिजे, त्यासाठी पूरक कार्यवाही करणे आवश्यक आहे. मराठी भाषेच्या समृद्धीसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘राज्य मराठी विकास संस्थेनी मराठी भाषेच्या समृद्धीसाठी हाती घेतलेले प्रकल्प महत्त्वपूर्ण आहेत. या संस्थेच्या माध्यमातून मराठी भाषेच्या समृद्धीसाठी वातावरण तयार करता येईल.’

Web Title: Computerized Marathi programs will be started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.