कॉम्रेड डांगे चरित्र ग्रंथातून उलगडणार

By Admin | Published: March 25, 2017 01:50 AM2017-03-25T01:50:59+5:302017-03-25T01:50:59+5:30

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक आणि कम्युनिस्ट कामगार चळवळीचे भीष्माचार्य म्हणून कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे सुपरिचित आहेतच.

Comrade Dange will unravel the character from the book | कॉम्रेड डांगे चरित्र ग्रंथातून उलगडणार

कॉम्रेड डांगे चरित्र ग्रंथातून उलगडणार

googlenewsNext

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक आणि कम्युनिस्ट कामगार चळवळीचे भीष्माचार्य म्हणून कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे सुपरिचित आहेतच. मात्र कॉ. डांगे यांच्या वैयक्तिक आयुष्यासह कामगार चळवळ आणि राजकारणातील विविध पैलू अद्याप जगासमोर आलेले नाहीत. डांगे यांच्या विविध आठवणी, विचार, खंत आणि असे बरेच काही त्यांच्या चरित्र ग्रंथातून उलगडण्याचे काम त्यांची मुलगी रोझा देशपांडे आणि जावई बानी देशपांडे यांनी केले आहे. रोझा आणि बानी लिखित ‘एस.ए. डांगे - एक इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन आज (शनिवारी) होत आहे. त्यानिमित्ताने रोझा देशपांडे यांच्याशी ‘लोकमत’चे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी साधलेला हा संवाद...
कॉम्रेड डांगे जाऊन २५ वर्षे उलटल्यानंतर चरित्र ग्रंथ लिहिण्याचे कसे सुचले?
लोकांसाठी कॉ. डांगे म्हणजेच माझ्यासाठी ‘डी’. ‘डीं’ना मी सातत्याने आत्मचरित्र लिहिण्यास सांगत होते. मात्र त्यांनी कधीच मनावर घेतले नाही. मात्र मी प्रयत्न सोडले नव्हते. ते असतानाच मी माहिती संकलनास सुरुवात केली होती. १९९१ साली डी गेल्यानंतर मी माहिती गोळा करण्याचा वेग वाढवला. या कामात मला माझे पती बानी देशपांडे मदत करत होते. तब्बल २० वर्षे माहिती संकलन केल्यानंतर चार वर्षांपूर्वी आम्ही दोघांनी मिळून डींचे चरित्र लिहिण्यास सुरुवात केली. आज इतक्या वर्षांची तपश्चर्या फळाला आली आहे.
लोकांना आतापर्यंत माहिती नसलेली कोणती बाजू तुम्ही पुस्तकात मांडली आहे?
देशावर चीनने केलेल्या आक्रमणावेळी ‘डी’ यांनी चीनविरोधात घेतलेली भूमिका सर्वांना माहीत आहे. मात्र त्यामागील भावना बहुतेकांना त्या वेळी समजली नाही. म्हणूनच पक्षातून त्यांच्याविरोधात बरीच नाराजी व्यक्त करण्यात आली. बहुतेकांनी तर कम्युनिस्ट असतानाही डांगे यांनी चीनविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र पंडित जवाहरलाल नेहरू यांचा डींवर पूर्ण विश्वास होता. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय परिषदेत देशाची भूमिका मांडण्यासाठी नेहरू यांनी डींना पाठवले. जगाचा नकाशा समोर ठेवून चीनने चुकून शिरकाव केला नसून ही घुसखोरी असल्याचे डी यांनी त्या वेळी सर्वच आंतरराष्ट्रीय नेत्यांना पटवून दिले. असे अनेक किस्से पुस्तकात सविस्तर दिले आहेत.
देशातील कम्युनिस्ट चळवळीची त्या वेळची परिस्थिती आणि आजचे अस्तित्व पाहता नेमके काय वाटते?
सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत भाष्य करणार नाही. त्या वेळी राजकारण आणि कामगार चळवळ यामध्ये सांगड घालण्याचे कौशल्य डींकडे होते. लोकमान्य टिळक हे त्यांचे मूलभूत गुरू होते. त्यांच्यापासून महात्मा गांधी, विनायक दामोदर सावरकर या थोर विचारांच्या गुरूंसोबत जाताना त्यांना कामगारांमध्ये मार्क्स आणि लेनिन सापडले. मात्र कालांतराने ज्या पक्षाची स्थापना त्यांनी केली, तो पक्षच त्यांना विसरला, ही खंत आहे.
कॉम्रेड डांगेंच्या राजकीय शत्रू आणि मित्रांबाबत काय सांगाल?
त्या वेळच्या राजकारणात निकष होते. राजकीय मतभेद होते, मात्र शत्रुत्व नव्हते. स्वत: महात्मा गांधी यांच्यासोबत डींचे मतभेद होते, मात्र तितकेच प्रेम आणि आदरही होता. माणुसकी सोडून वागणे हे भावच नव्हते.
पुस्तकांचा सारांश काय सांगतो?
डींचे सर्वंकष आयुष्यच पुस्तकात रेखाटले आहे. डींशी संबंधित सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांचा इतिहास मांडला आहे. स्टॅलिन, ख्रुश्चेव्ह, ब्रेझनेव्ह या आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट नेत्यांपासून अगदी बोस, नेहरू, टिळक यांच्यासह इंदिरा गांधींपर्यंत सर्वच नेत्यांसोबतच्या डींच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा प्रयत्न आहे.

Web Title: Comrade Dange will unravel the character from the book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.