सांस्कृतिक मानदंडाची संकल्पना व्यापक हवी

By admin | Published: January 17, 2016 12:58 AM2016-01-17T00:58:30+5:302016-01-17T00:58:30+5:30

पिंपरी येथील ८९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आपल्या लेखी अध्यक्षीय भाषणात दहशतवादापासून ते शेती, राजकारण, आंतरराष्ट्रीय समाजकारण, धर्मनिरपेक्षता

The concept of cultural norms should be broad | सांस्कृतिक मानदंडाची संकल्पना व्यापक हवी

सांस्कृतिक मानदंडाची संकल्पना व्यापक हवी

Next

पिंपरी येथील ८९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आपल्या लेखी अध्यक्षीय भाषणात दहशतवादापासून ते शेती, राजकारण, आंतरराष्ट्रीय समाजकारण, धर्मनिरपेक्षता अशा विविध मुद्द्यांवर सविस्तर विवेचन केले. त्याचा गोषवारा...

स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत राजकारण्यांनी दुष्काळ कायमस्वरूपी घालविण्यासाठी काय केले याचे उत्तर प्रायश्चित्तासह दिले गेले पाहिजे. पाण्याच्या शोषण व्यवस्थेमुळे मूठभर राजकारणी, बागायतदार, कारखानदार अधिक श्रीमंत झाले.
मराठी संस्कृतीचे मानदंड म्हणून काहींनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह वीर सावरकर, महात्मा फुले, फुले-शाहू-आंबेडकर यांना तर काहींनी हेडगेवार-गोळवलकरांना घोषित केले आहे. एवढ्या फळ्या-चिरफळ्या करून मराठी संस्कृती जगायची कशी? काही मूठभर लोकांनी श्रद्धेवर मात करीत मानदंड म्हणून महापुरुष, संतांच्या फळ्या पाडण्याचा प्रयत्न केला आहे. हे चुकीचे आहे. सांस्कृतिक मानदंडाची संकल्पना व्यापक व वस्तुनिष्ठ निक षावर हवी.
राज्यात १० लाख हेक्टरवर ऊस पीक असताना त्यापैकी केवळ २ लाख हेक्टरवरील उसालाच ठिबक सिंचनाने पाणी दिले जाते. उर्वरित ८ लाख हेक्टरवरील पाणी त्यामुळे वाया जाते. सरकार याबाबत गंभीर नसल्याने सूक्ष्म सिंचन योजनेची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. पाणी तेथे ऊस आणि ऊस तेथे कारखाना या सूत्राऐवजी पाण्याची पत्ता नसतानाही पुढारी तेथे साखर कारखाना हे सूत्र कुणाच्या १०० पिढ्यांच्या ऐतखाऊपणाच्या स्वार्थासाठी राबवले जातेय, असा सवाल करीत श्रीपाल सबनीस म्हणाले, कारखाना विकत घेताना व नंतर मोडीत काढताना होणाऱ्या आर्थिक भ्रष्टतेवर महाकाव्ये निर्माण होतील. शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारे व्यापारी, दुकानदार, त्यांची शेती गहाण ठेवून व्याजात मारणारे सावकार कायद्याच्या राज्यात मोकाट
का व कसे? ब्राह्मणशाही, भांडवलशाही, जागतिकीकरणातील नवी साम्राज्यशाही
यांच्या रगाड्यात कृषी व्यवस्थेची वाट लागली आहे. सरकार चालविणाऱ्या आजवरच्या सर्व मंत्र्यांनी त्यांचे खरेखुरे आत्मचरित्र लिहावे, असे आवाहन करीत सबनीस म्हणाले, त्यामुळे जनतेचे प्रबोधन होऊन सत्य समोर येईल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. राजकारण्यांचे आत्मचरित्र आणि शेतकऱ्यांची आत्महत्या याचा संबंध दुर्दैवाने आहे, हे नाकारून चालणार नाही.
मराठी लेखकांनी आंतरराष्ट्रीय वास्तवाचे आकलन करून त्यानुसार आपल्याला बदलल्याशिवाय ज्ञानपीठ व नोबेलसारख्या पुरस्कारांची मराठी लेखकांकडून अपेक्षा ठेवता येणार नाही. धर्म, समाज, संस्था, संघटनांनी महापुरुषांची विभागणी करून त्यांना जात-धर्म-पंथनिहाय केले आहे. त्यामुळे सांस्कृतिक दुफळी माजली आहे. जातीच्या चौकटीत महापुरुषांना बंदिस्त करून सत्याच्या नावे असत्याची दुकानदारी समाज का खपवून घेत आहे, असा प्रश्न करीत सबनीस म्हणाले, महापुरुष हे एका जातीचे, धर्माचे असतात का? असतील तर ते महापुरुष कसे? वेगवेगळ्या कालखंडात महापुरुष जन्माला आले आणि त्यांनी मानवी समाजाच्या कल्याणासाठी कार्य केले. त्यामुळे त्यांना असे विभागने चुकीचे आहे. विविध जात-धर्मात जन्मलेल्या प्रतिभावंत कलावंतांनी जातीच्या, जन्मसंदर्भाची गुलामी मोडीत काढून सेक्युलर जाणिवा जपल्या पाहिजेत आणि त्या वाढविल्या पाहिजेत. हजारो कवी-लेखक-अभ्यासकांनी सेक्युलर वाङ्मयीन जाणिवांची उधळण करून मराठी सारस्वतांमध्ये नवा सेक्युलर प्रवाह सुरू केला असून, तो विकसित झाला पाहिजे. एम.एफ. हुसेन यांची शोकांतिका, तसलिमा नसरीनच्या सांस्कृतिक कोंडमाऱ्याची सत्यकथा, असीम त्रिवेदींच्या चित्रकलेची मुस्कटदाबी, लोककलावंत गदर यांचे भोगलेपण अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा बोजवारा उडाल्याची प्रचिती देतात. त्यामुळे सत्यावर आधारित इतिहासलेखन, अभिव्यक्ती स्वातंत्र्य वर्तमानात कठीण झाले आहे. दहशतवाद हा फक्त जागतिक व मुस्लीम संघटनांचाच नाही, तर तो सर्व जातीयवाद्यांचा आहे. तसेच राजकीय दहशतवादसुद्धा आहेच. दादरी प्रकरण, कलबुर्गी हत्या यामुळे लेखकांनी पुरस्कार वापसी केली हा त्यांच्या स्वातंत्र्याचा भाग आहे. पण लेखक-विचारवंतांचे सामर्थ्य लेखणीत आहे. त्यामुळे त्यांनी समाजाचे, सरकारचे प्रबोधन त्यातून करून संवाद साधला पाहिजे. त्यानंतर संघर्षाची भूमिका घ्यायला हवी होती. मात्र तसे न झाल्याने लेखकांमध्ये फूट पडली आणि काँग्रेस प्रणीत, भाजपा प्रणीत लेखक अशी बदनामी लेखणीची झाली.
परिवर्तनासाठी आयुष्य वेचणाऱ्या महात्मा गांधी यांना परिवर्तनवादी प्रवाहात, विद्रोही चळवळीत मानाचे तर सोडाच नामाचेही स्थान मिळाले नाही. भारताचा नकाशा ओलांडून जगाच्या इतिहासात वंदनीय ठरलेले गांधी मार्क्स-फुले-आंबेडकरांच्या मालिकेत घेतले गेले नाहीत. मानवतावादी मूल्यात्मकतेचा सारांश पचवलेले महात्मा परिवर्तनाच्या प्रवाहात अस्पृश्य का ठरवले गेले, याचा विचार करणे गरजेचे आहे. हिंदी मुशायऱ्यात मुस्लीम स्त्रियांचा वाढलेला सहभाग आणि त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरताना मराठी कविता व साहित्य विश्वात मात्र मुस्लीम स्त्रियांचे वाङ्मयीन कर्तृत्व फारसे नसावे ही चिंताजनक बाब आहे. नव्या प्रतिभावंतांच्या कथावाङ्मयासाठी नव्या ऊर्मीचे व नव्या जाणिवेचे समीक्षकही हवेत. त्याशिवाय लेखकांचे वाङ्मयीन मूल्य अधोरेखित होणार नाही. समीक्षकांच्या तुटवड्याने अनेक मराठी कथाकार यथार्थ मूल्यमापनापासून दूर राहिले,
ही सद्य:स्थिती आहे.

Web Title: The concept of cultural norms should be broad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.