"समृद्धी"ची ओळख जागतिक स्तरावर होईल अशा संकल्पना स्वीकारणार: मुख्यमंत्री
By admin | Published: July 9, 2017 06:31 PM2017-07-09T18:31:24+5:302017-07-09T18:31:53+5:30
एकीकडे राज्यात मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध वाढत असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र समृध्दी महामार्गाची ओळख जागतिक स्तरावर होईल
Next
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 9 - एकीकडे राज्यात मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध वाढत असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र समृध्दी महामार्गाची ओळख जागतिक स्तरावर होईल अशा नाविन्यपूर्ण संकल्पना स्वीकारणार असल्याचं म्हटलं आहे. राज्याच्या विकासाला नवी दिशा देणा-या महत्वाकांक्षी नागपूर-मुंबई या समृध्दी महामागार्मुळे केवळ वेळेची बचतच होणार नसून राज्यातील २४ जिल्ह्यांना त्याचा लाभ होणार आहे. समृध्दी महामार्ग व कॉरिडोर तयार करण्यासाठी नाविण्यपूर्ण तसेच सर्वोत्कृष्ट निर्मितीसाठी अभियांत्रिकी रचनाकारांनी संकल्पना तयार करुन सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आंतरराष्ट्रीय पूल व बोगदे परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. पूल व बोगद्यांच्या निर्मितीसाठी सर्वोत्कृष्ट रचना आणि आकर्षकते संदर्भातील आंतरराष्ट्रीय अभियंता परिषदेचे आयोजन केंद्रीय महामार्ग निर्मिती विभाग, राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग व भारतीय राष्ट्रीय पूल व अभियांत्रिकी स्थापत्य अभियंत्यांच्या संघटनेमार्फत करण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संयोजक संघटनेचे अध्यक्ष तथा एन एच ए आयचे सदस्य डी. ओ. तावडे, आय. के. पांडया, तांत्रिक समितीचे अध्यक्ष ए. के. बॅनर्जी, डॉ. वर्षा सुब्बाराव, आर. के.पांडे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अजित सगणे व्यासपिठावर उपस्थित होते.
समृद्धीला विरोध वाढला-
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध तीव्र होत आहे. समृद्धी महामार्गाला जमिनी देणार नाही, बळजबरी केली तर सामुदायिक आत्महत्या करू असा इशारा सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे. नाशिकमधील शिवडे गावासह 49 गावातील ग्रामस्थांनी सामूहिक आत्महत्येचा इशारा दिला आहे. तर एका शेतक-यानं स्वतःचं सरण रचलं आहे. याशिवाय झाडाला दोर बांधून गळफास घेण्याचा इशाराही अनेक शेतक-यांनी दिला आहे. समृद्धी महामार्गाला विरोध तीव्र बनला असून तणावपूर्ण परिस्थिती आहे.
सिन्नर तालुक्यासह नाशकात ‘समृद्धी’च्या दरपत्रकाची होळी-
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीचे दर जाहीर झाल्याचे तीव्र पडसाद जमीन मालकांमध्ये उमटले असून, शनिवारी शिवडे व नाशिक येथे संतप्त शेतकऱ्यांनी शासनाने जाहीर केलेल्या दरपत्रकाची होळी करून आपला निषेध नोंदविला तर दुसरीकडे प्रशासनानेही तातडीने तलाठ्यांची बैठक घेऊन जमिनीच्या थेट खरेदीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले. शिवसेना, राष्ट्रवादी व किसान सभेने यासंदर्भात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे जाहीर केल्याने नजिकच्या काळात आंदोलन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सिन्नर व इगतपुरी या तालुक्यातील जमीनमालकांसाठी जिल्हा समितीने दर निश्चिती केले असून, थेट खरेदीने जमीन देण्यास संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना ४८ तासांत पैसे अदा करण्याची भूमिका घेतली आहे. जाहीर झालेले दर शेतकरी स्वीकारतील, अशी अपेक्षा असतानाच त्याचे तीव्र पडसाद शनिवारी उमटले.
सिन्नर तालुक्यातील शिवडे येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत सकाळी दरपत्रकाची होळी केली. यावेळी शासनाला जमीनच द्यायची नाही तर दर कशाला, असा सवाल विचारण्यात आला. शासनाने जाहीर केलेल्या दराबाबत निर्णय घेण्यासाठी समृद्धी महामार्ग विरोधी शेतकरी संघर्ष समितीची तातडीची बैठक आयटक कार्यालयात अध्यक्ष कॉ. राजू देसले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत बागायती, जिरायती असा दर जाहीर करून शासन शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात आला. ४० ते ६० लाख रुपये हेक्टरी दर ही एकत्र कुटुंब पद्धतीच्या गुजराणासाठी पुरेशी नाही. या महामार्गाच्या विरोधात उच्च न्यायालयात ३१ केसेस उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या असून, शासन यासंदर्भात न्यायालयाच्या नोटिसांना उत्तरे देत नाही तर दुसरीकडे दर जाहीर करीत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. शासकीय अधिकाऱ्यांनी बागायती जमिनी जिरायती दाखविल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली. शासनाने समृद्धीचा मार्ग बदलावा, एकही शेतकरी जागा देणार नाही, असा निर्धार यावेळी करण्यात आला. या बैठकीनंतर शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेऊन दरपत्रकाची होळी केली. यावेळी शासन तसेच शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोेषणाबाजी करण्यात आली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलीस यंत्रणेची प्रचंड धावपळ उडाली. परंतु शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता त्यांना ताब्यात न घेता नंतर गुन्हा दाखल करण्याचे ठरविण्यात आले. या आंदोलनात सोमनाथ वाघ, कचरू पाटील, भास्कर गुंजाळ, रतनकुमार इचम, दौलत दुभाषे, अरुण गायकर, पांडुरंग वारूंगसे, मुकुंदा कडू, विष्णुपंत वाघचौरे, विलास आव्हाड, रामेश्वर शिंदे, संदीप खताळे, गंगाधर गुंजाळ, रतन लंगडे, यशवंत गावढे, मधुकर फोकणे, तोकडे काळू, शशिकांत आव्हाड आदी शेतकरी उपस्थित होते.
अन्य ठिकाणीही होळी-
शासनाने समृध्दी महामार्गासाठी थेट खरेदीद्वारे जमिनीचे दरपत्रक जाहीर केल्याने सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील बागायती भागातील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत जमिनीच्या दरपत्रकांची होळी केली. शनिवारी सकाळी डुबेरे, सोनारी येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत शासनाचा निषेध केला. आम्हाला जमिनी द्यायच्या नाही असे सांगत शेतकऱ्यांनी जमिनीचे दरपत्रक जाळले.