अभियांत्रिकी महाविद्यालयांना प्रवेशाची चिंता
By admin | Published: January 10, 2016 01:03 AM2016-01-10T01:03:25+5:302016-01-10T01:03:25+5:30
बारावीच्या परीक्षेला अद्याप दीड महिन्याचा अवकाश असताना राज्यातील काही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मात्र बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. प्रवेश कसे वाढतील, या मुद्यावरच
- योगेश पांडे, नागपूर
बारावीच्या परीक्षेला अद्याप दीड महिन्याचा अवकाश असताना राज्यातील काही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मात्र बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. प्रवेश कसे वाढतील, या मुद्यावरच या बैठकांमध्ये भर देण्यात येत आहे. दर वर्षी वाढणाऱ्या रिक्त जागांच्या प्रमाणामुळे राज्यभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांसमोर मोठे आव्हान
उभे ठाकले आहे. त्यामुळेच
परीक्षांच्या अगोदरच ‘मार्केटिंग’ कसे करता येईल या संदर्भात चाचपणी सुरू आहे.
राज्यातील ३६७ अभियांत्रिकी महाविद्यालयांत १ लाख ५३ हजार ८६७ जागा आहेत. २०१५-१६ या वर्षात यापैकी ६४ हजार ६३५ म्हणजेच सुमारे ४२ टक्के जागा रिक्त होत्या. अगदी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांत देखील जागा रिक्त होत्या.
प्रवेशच नसल्यामुळे अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांची स्थिती अडचणीची झाली आहे. याचा फटका तेथील प्राध्यापकांनादेखील बसत असून, अनेक ठिकाणी तर ६-६ महिने वेतन मिळालेले नाही. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) अंतर्गत विद्यार्थी नामवंत महाविद्यालयांनाच जास्त प्राधान्य देतात.
हीच बाब लक्षात घेता व्यवस्थापन ‘कोटा’मधून मिळतील तितके प्रवेश करण्याचा महाविद्यालयांचा प्रयत्न असतो.
बाहेरील राज्यांकडूनदेखील निराशा
गेल्या काही वर्षांपासून महाविद्यालयांचे प्राध्यापक व प्रतिनिधी विद्यार्थी शोधण्यासाठी चक्क बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर व पंजाब या राज्यांकडे धाव घेताना दिसून आले.
विविध ‘आॅफर्स’ देऊनही मागील वर्षी हवा तसा प्रतिसाद लाभला नव्हता. त्यामुळे काही महाविद्यालयांनी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या शिकवणी वर्गांच्या चालकांशीच संपर्क साधला आहे.
विदर्भ, मराठवाड्याला फटका
मुंबई, पुण्याकडील महाविद्यालयांत प्रवेश घेण्याकडे राज्यातील विद्यार्थ्यांचा कल असतो. याचा फटका विदर्भ व मराठवाड्यातील महाविद्यालयांना बसताना दिसून येतो.
गेल्या काही वर्षांत ‘बेसिक सायन्स’कडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे सोबतच महाविद्यालयांच्या दर्जाचादेखील प्रश्न आहेच. या विविध कारणांमुळे रिक्त जागांचे प्रमाण वाढीस लागले आहे, असे मत तंत्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी व्यक्त केले.
४२ टक्के जागा रिक्त
राज्यातील ३६७ अभियांत्रिकी महाविद्यालयांत १ लाख ५३ हजार ८६७ जागा आहेत. २०१५-१६ या वर्षात यापैकी ६४ हजार ६३५ म्हणजेच सुमारे ४२ टक्के जागा रिक्त होत्या. अगदी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांत देखील जागा रिक्त होत्या.
राज्यातील अभियांत्रिकी
प्रवेशाची स्थिती
वर्षजागारिक्त जागा
२०१०-१११,१४,२६८२०,८४०
२०११-१२१,३४,०२४३०,७१५
२०१२-१३१,४८,२९४४१,६०३
२०१३-१४१,५४,८२७५२,४००
२०१४-१५१,६३,०००६४,००० (सुमारे)
२०१५-१६१,५३,८६७६४, ६२५