बाळाच्या भविष्याची चिंता?
By admin | Published: June 12, 2015 04:20 AM2015-06-12T04:20:14+5:302015-06-12T04:20:14+5:30
आर्थिक बाजू भक्कम असतानाही माहीम येथील उच्चभ्रू इमारतीत राहणाऱ्या स्वरा सावळाराम कासकर (४२) हिने मुलाच्या भवितव्याच्या काळजीतून त्याची
मनीषा म्हात्रे, मुंबई
आर्थिक बाजू भक्कम असतानाही माहीम येथील उच्चभ्रू इमारतीत राहणाऱ्या स्वरा सावळाराम कासकर (४२) हिने मुलाच्या भवितव्याच्या काळजीतून त्याची निर्घृण हत्या करत स्वत: आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना बुधवारी घडली. सगळे काही ठाकठिक असताना मुलाच्या असुरक्षिततेची भावना नेमकी कशी निर्माण झाली? या दिशेनेच सध्या पोलिसांचा शोध सुरू आहे.
माहीम पश्चिमेकडील गॅब्रिएल हाउस या इमारतीतील चौथ्या मजल्यावर स्वरा पती, मुलगा आणि सासू-सासऱ्यांसह राहत होती. साडेतीन वर्षांपूर्वी तिचे सावळारामसोबत लग्न झाले. पती गोरेगावच्या खाजगी कंपनीत कामाला होता. मात्र वर्षभरापासून सावळाराम घरीच होता. तर ती स्वत: नौदलात लिपिक पदावर कार्यरत होती. परिसरातील भाऊजी किरमार्ग परिसरातील राजीव को-आॅप. हाउसिंग सोसायटीमध्ये त्यांचा फ्लॅट आहे. लग्नानंतर महिन्यातून दोघेही किमान एक-दोन दिवस या फ्लॅटमध्ये येऊन राहत असल्याचे सोसायटीचे अध्यक्ष डी टोनी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. आठ महिन्यांपूर्वी त्यांच्या हर्ष या मुलाचा जन्म झाला. हर्षच्या आगमनाने कासकर कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यांच्या घराण्यातील तो दुसरा मुलगा होता. त्यामुळे सर्वांनाच त्याचे कौतुक होते.
सर्वकाही ठीक चालले असताना बुधवारचा दिवस कासकर कुटुंबीयांसाठी घातवार ठरला. बुधवारी बँकेचे काम आहे, असे सांगून स्वराने कामावरून सुट्टी घेतली. दुपारी बँकेचे काम आटोपून ती घरी परतली. सायंकाळी ५च्या सुमारास बाळाला अंंघोळ घालून त्याला नवीन कपडे घातले. त्याची तयारी केली. सासू-सासऱ्यांसोबत हर्षचे लाड पुरविले. गार्डनमध्ये जाऊन येते, असे सांगून घराबाहेर पडलेली स्वरा आणि चिमुकला घरी परतलेच नाहीत. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तिने माहीम येथील दुसरे घर गाठून स्वत:सह बाळाला संपवले.
बराच वेळ झाला तरी स्वरा बाळासोबत घरी न आल्याने तिच्या शोधासाठी पती सायंकाळी साडेसातच्या सुमारास घराबाहेर पडले. गार्डनमध्ये तिचा शोध घेतला. शेजारच्यांकडेही विचारपूस केली. मात्र स्वरा सापडली नाही. अधिक शोधासाठी दुसऱ्या घराकडे धाव घेतली तेव्हा घराचा दरवाजा आतून लॉक होता. स्वराला बराच आवाज देऊनही आतून काहीच प्रतिसाद येत नाही, या चिंतेने सावळारामने घराच्या खिडकीची काच तोडली. समोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला हर्ष आणि स्वरा त्याला दिसले, आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
ही माहिती माहीम पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा तोडून स्वरासह बाळाचा मृतदेह ताब्यात घेतला. दोघांच्या मृतदेहाशेजारी चाकू आणि कोयता ही हत्यारे सापडली. मुलाच्या चिंतेत आत्महत्या करत असलेली सुसाईड नोटही पोलिसांना सापडली.
या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र मुलाच्या चिंतेने स्वराला एवढे का ग्रासले होते, कोणती असुरक्षितता तिला जाणवली, तिच्यावर एवढा तणाव का निर्माण झाला? या दिशेने पोलिसांचा तपास सुरू
आहे.