काँक्रीटचा फास : गोदापात्रातील प्राचीन सतरा कुंड गायब !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2017 12:59 PM2017-02-27T12:59:41+5:302017-02-27T12:59:41+5:30
गोदावरी नदीचे महत्त्वाचे नैसर्गिक जलस्त्रोत म्हणजेच पेशवेकालीन सतरा कुंड विकासाच्या नावाखाली महापालिकेने गायब केल्याने नदीला भुगर्भातील हक्काचे पाणी मिळणेही दुरापास्त झाले आहे.
अझहर शेख, आॅनलाईन लोकमत
नाशिक , दि. २७ - सर्वांत जास्त लांबी असलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या गोदावरी या राष्ट्रीय नदीचा उगम त्र्यंबकेश्वरला झाला. नाशिकमार्गे ही नदी पुढे प्रवाहित झाली आहे. गोदावरीचे नैसर्गिक जलस्त्रोत अत्यंत उत्तम असून, बारामाही शुद्ध पाणी प्रवाहित ठेवण्याची क्षमता गोदामाईमध्ये आहे, असा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला आहे; मात्र दुर्दैवाने नदीचे महत्त्वाचे नैसर्गिक जलस्त्रोत म्हणजेच पेशवेकालीन सतरा कुंड विकासाच्या नावाखाली महापालिकेने गायब केल्याने नदीला भुगर्भातील हक्काचे पाणी मिळणेही दुरापास्त झाले आहे.
नाशिक शहराचे वैभव गोदावरी नदीमुळे टिकू न आहे. जगाच्या नकाशावार गोदावरीमुळे नाशिकला स्थान असले तरी नाशिकच्या राज्यकर्त्यांना व प्रशासनाला मात्र गोदावरी संवर्धनासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक वाटत नाही ही दुर्देवाची बाब आहे. त्र्यंबकेश्वरच्या ब्रम्हगिरी पर्वतावरुन उगम पावलेली गोदावरी नाशिकवरून १ हजार ४६५ किलोमीटरचा प्रवास करून आंध्रप्रदेशमधून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. या नदीचे नैसर्गिक जलस्त्रोत बळकट असून भुगर्भामधील पाण्याच्या साठ्यावर गोदावरी बारामाही प्रवाहित सहज राहू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे; मात्र त्याआगोदर त्र्यंबकेश्वरपासूनच गोदावरीचा ‘मार्ग’ मोकळा करण्याची गरज आहे कारण गोदावरीच्या तटावर कॉँक्रीटीकरण करून त्र्यंबकेश्वर परिसरात नदीचे ९३ कुंड बुजविण्यात आले आहे. तसेच शहरात अहल्यादेवी होळकर पुलापासून पुढे तपोवनापर्यंत एकूण १७ प्राचीन कुंड आहेत. या कुंडामध्ये नदीचे नैसर्गिक जलस्त्रोत जिवंत ठेवण्याचे काम त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी केले; मात्र दुर्देवाने सध्याच्या राज्यकर्त्यांना त्याचे महत्त्व समजले नाही. परिणामी कॉँक्रीट घाट नदीभोवती विकसीत करून हे सर्व कुंड त्या कॉँक्रीटआड करत नदीला धरणाच्या पाण्यावर अवलंबून ठेवले. पावसाळ्यानंतर नदीमधून गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी वाहताना दिसते तसेच नदीप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. एकलहर औष्णिक केंद्रासाठी जेव्हा विसर्ग गंगापूर धरणातून केला जाता तेव्हा गोदावरीच्या पात्रातून शुध्द पाणी प्रवाहित होताना दिसून येते. अन्यथा गोदावरीमधून केवळ सांडपाणी वाहते की काय? अशीच शंका अन्य शहरांमधून धार्मिक पर्यटनासाठी गोदाकाठी आलेल्या भाविकांना आल्याशिवाय राहत नाही.
मॅगसेसे पुरस्कार विजेते व जल आणि नद्यांचे अभ्यासक राजेंद्र सिंह यांनी गोदावरीचे वारंवार सर्वेक्षण करत गोदावरीमध्ये महापालिकेने ठिकठिकाणी सोडलेले सांडपाणी बंद करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत ‘रिवर’ मधून ‘सिवर’ वेगळे केले जात नाही तोपर्यंत नदीचे प्रदूषण थांबणार नाही, असे सिंह यांनी वारंवार प्रशासनाच्या लक्षात आणून दिले आहे.
आयुक्तांकडे तांत्रिक अहवालासह सविस्तर तक्रार
माघ शुध्द दशमीला गोदावरीचा प्रगटदिन गोदाप्रेमींनी गेल्या ६ फेब्रवारीला साजरा केला. यावेळी गोदावरीच्या संपुर्ण अभ्यास करत भुगर्भातील जलस्थिती व त्याचा नदीला होणारा फायदा याचा संपुर्ण तांत्रिक अहवाल तयार करून महापालिकेला उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह व पाण्याचा मानवी वसाहतीशी संबंध या विषयाच्या अभ्यासक डॉ. प्राजक्ता बस्ते यांनी गोदावरीचे नैसर्गिक जलस्त्रोत पुनर्जिवित करण्याबाबतचा सविस्तर अहवाल तयार करून याचिकाकर्ता देवांग जानी यांच्यासह शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याकडे सादर केला आहे.
या प्राचीन कुंडांवर कॉँक्रीट
गोपिकाबार्इंचा तास...
१) सन १७६१ ते १७७२च्या काळात माधवराव पेशवा यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनी सदरच्या तासाचे निर्माण केले. त्याची लांबी ४३० फूट व दहा फूट रुंदी आणि दहा फूटी खोली असलेले कुंड अहल्यादेवी होळकर पुलाच्या बंधाऱ्यापासून या कुंडाची सुरूवात होते.
२) लक्ष्मण कुंड : सन १७५८ साली सरसुबेदार महादजी गोविंद काकडे यांनी लक्ष्मण कुंड बांधला. या कुंडांचा आकार १६.४५ मीटरचा आहे. या कुंडात जिवंत पाण्याचे झरे असल्यामुळे काकडे यांनी कुंड बांधून येथील जलस्त्रोत जतन केला. सन १८७७-७८च्या दुष्काळात संपूर्ण नदीपात्र कोरडेठाक पडले होते त्यावेळी देखील या कुंडात मोठ्या प्रमाणावर पाणी आढळून आल्याचे नाशिककरांनी बघितले होते.
३) धनुष कुंड : हा कुंड १५ फूट लांब, सात फुट रुंद आहे. धनुष कुंडातून गोदावरी नदी पुर्वेकडून दक्षिणेकडे वळण घेते यामुळे गोदावरीला दक्षिणगंगा अथवा दक्षिण वाहिनी गोदावरी असे म्हटले जाते.
४) रामकुंड : गोदावरीचे अत्यंत पवित्र मानले जाणारे रामकुंड हे प्रभू रामचंद्रांच्या स्नानाची जागा असल्याचे बोलले जाते. रामचंद्र या कुंडाचा वापर त्यावेळी स्नानासाठी करत असे अशी अख्यायिका आहे. ८३ फूट लांब व ४० फूट रुंदीचे हे कुंड आहे. या कुंडात अस्थी वलय तीर्थ आहे. या तीर्थात अस्थी विसर्जन केल्यानंतर काही क्षणातच अस्थी विरघळून जातात. या कुंडाचे बांधकाम १६९६ साली चित्रराव खटाव यांनी केले तर १७७२ साली गोपिकाबाई पेशवे यांनी या कुंडाची दुरूस्ती केली.
५) सीता कुंड : रामकुंडापासून दक्षिणेला दहा फूट अंतरावर सीता कुंड आहे. ३३ फूट लांब व ३० फूट रुंद असे या कुंडाचे आकार आहे. या कुंडाचे बांधकामही गोपिकाबाई पेशवे यांनी केले होते.
६) अहल्यादेवी कुंड : नदीच्या दक्षिणेला वीस फूट अंतरावर अहल्यादेवी मंदिराच्या समोर अहल्यादेवी कुंड आहे. ६० फूट लांबीचा व ४२ फूट रुंदीचा आकार असलेल्या या कुंडाचे बांधकाम १७६६ ते १७९५च्या कालावधीत इंदोर राज्याच्या राजकन्या अहल्यादेवी होळकर यांनी केले होते.
७) सारंगपाणी कुंड : अहल्यादेवी कुंडाच्या पश्चिमेला हा कुंड आहे. ३९ फूट लांब व ३४ फूट रुंद आहे. कुंडाचे बांधकाम १७७९ साली करण्यात आले आहे.
८) दुतोंड्या मारूती कुंड : अहल्यादेवी कुंडाच्या दक्षिणेला सदरचा कुं ड आहे. ५० चौरस फूट व ४.६४ चौरस मीटर आकाराचा हा कुंड आहे.
९) सूर्य कुंड : सारंगपाणी कुंडाचय दक्षिणेला सूर्य कुंड आहे. बालाजी महादेव ओक यांनी १७५८साली बांधला आहे. याच कुंडात पाच देऊळ मंदिरासमोरच्या पुलालगत १८७४साली तात्या महाराज, पुनावाले यांच्या पत्नीने बांधला आहे.
अशा एकूण सतरा कुंडांवर महापालिकेने विकासाच्या नावाखाली २००१ साली कॉँक्रीट टाकले. यामुळे थेट नदीपात्राचे कॉँक्रीटीकरण करण्यात आल्याने भुगर्भामधील जलस्त्रोत बुजले गेले आणि नदीवर जलसंकट निर्माण झाले. या सर्व कुंडांचा उल्लेख १८८३च्या नाशिक गॅझेटर मुंबई प्रेसिंडेंसीमध्ये सविस्तर आढळतो.