देशभर उभारणार कॉँक्रिटचे रस्ते
By admin | Published: January 24, 2015 01:39 AM2015-01-24T01:39:00+5:302015-01-24T01:39:00+5:30
देशामध्ये दरवर्षी ५ लाख अपघात होतात, त्यामध्ये साधारणपणे दीड लाख लोकांचे बळी जातात. तर ३ लाख जणांना अपंगत्व येते.
पुणे : देशामध्ये दरवर्षी ५ लाख अपघात होतात, त्यामध्ये साधारणपणे दीड लाख लोकांचे बळी जातात. तर ३ लाख जणांना अपंगत्व येते. यातील ७० टक्के अपघात चालकाच्या चुकीमुळे होत असल्याचे अहवाल सांगतो; मात्र मला तो अहवाल मान्य नाही. देशातील रस्त्यांची रचना व्यवस्थित नाही, त्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे, यामुळेच मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
आॅटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन आॅफ इंडिया (एआरएआय) या संस्थेतर्फे आयोजित ‘आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान परिषदे’च्या समारोपप्रसंगी गडकरी बोलत होते. देशभरातील अपघातप्रवण क्षेत्रांची यादी तयार करण्यात आली असून, त्या ठिकाणी रस्त्यांमध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. संसदेच्या पुढच्या अधिवेशनामध्ये ‘रस्ते सुरक्षा’ विधेयक आणले जाणार आहे.
देशभरातील रस्ते सिमेंट-काँक्रिटचे बनविण्याचे लक्ष्य आहे. त्यानंतर अनेक वर्षे रस्त्यांच्या देखभालीचा प्रश्नच राहणार नाही. त्याकरिता २७ जानेवारीला ४० सिमेंट कंपन्यांशी करार करण्यात येणार असून, १२० रुपयांमध्ये सिमेंट बॅग उपलब्ध होणार आहे, असे ते म्हणाले. देशातील ३० टक्के वाहन परवाने (लायसन्स) बोगस आहेत. वाहन चालविण्याच्या प्रशिक्षणासंदर्भात देशभर १० हजार इन्स्टिट्यूटची निर्मिती केली जात आहे. यापुढे संगणकाद्वारे वाहनचालकांची चाचणी घेतली जाणार आहे, असे गडकरी म्हणाले.
च्जमीन तसेच पाण्यावर चालणाऱ्या बस परदेशातून खरेदी केल्यास त्याचे तिकीटदर आपल्याला परवाडणार नाहीत. त्यामुळे देशातच अशा बसची निर्मिती होण्याची गरज आहे. आॅटोमोटिव्ह क्षेत्रातील शास्त्रज्ञांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा. नवे तंत्रज्ञान हे स्वीकारावेच लागेल, एकतर ते तुम्ही इथे तयार करा नाहीतर ते बाहेरून मागवावे लागेल. संशोधकांना आता जास्त वेळ देता येणार नाही. जो पळू शकणार नाही त्याला बाहेरचा रस्ता दाखविला जाईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
जलवाहतुकीला प्राधान्य
रस्ते, रेल्वे व जल वाहतूक यामध्ये जल वाहतूक ही सर्वांत किफायतशीर आहे. रस्ते वाहतुकीला प्रतिकिलोमीटर दीड रुपया, रेल्वे वाहतुकीला एक रुपया तर जल वाहतुकीला केवळ ३० पैसे खर्च येतो. काही दिवसांत नवीन १०१ वॉटरवेज तयार केले जाणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.