काँक्रिटीकरण मार्गी लावा
By admin | Published: May 16, 2016 02:54 AM2016-05-16T02:54:54+5:302016-05-16T02:54:54+5:30
खड्डे बुजवण्याचे काम महापालिकेने न करता संबंधित कंत्राटदाराकडूनच करून घ्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे केली
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे संथ गतीने सुरू आहेत. पावसाळा नजीक आल्याने ही कामे तातडीने मार्गी लावा, तसेच पावसाळ्याच्या धर्तीवर अशा कामांच्या ठिकाणचे खड्डे बुजवण्याचे काम महापालिकेने न करता संबंधित कंत्राटदाराकडूनच करून घ्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे केली आहे.
विविध प्रभागांमध्ये सुरू असलेली काँक्रिटीकरणाची कामे पाहता तेथील परिस्थिती चिंताजनक आहे. अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. मात्र, विविध कंपन्यांच्या केबल, विजेचे खांब हलवण्याची कार्यवाही अजूनही पूर्ण झालेली नाही. या रस्त्यांच्या शेजारील पदपथांखालील गटारांची कामे आणि पदपथांची कामेही अतिशय संथ गतीने सुरू आहेत. काही ठिकाणी लाद्या बसवलेल्या नाहीत. ही कामे २०-२२ दिवसांत पूर्ण होणे शक्य नसल्याकडे भोईर यांनी लक्ष वेधले आहे. पावसाळ्यात कोणतीही गंभीर समस्या उद्भवू नये, यासाठी काँक्रिटीकरणाच्या ठिकाणी खोदलेले खड्डे संबंधित कंत्राटदाराकडूनच भरून घ्यावेत. त्यासाठी महापालिकेने वेगळा खर्च करू नये, अशी विनंती भोईर यांनी रवींद्रन यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. (प्रतिनिधी)