देशाची अवस्था देवनार डंपिंग ग्राऊंडसारखी, उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका

By admin | Published: April 19, 2016 09:13 AM2016-04-19T09:13:29+5:302016-04-19T09:15:39+5:30

हिंदुस्थानातील जनतेच्या मनात नेमकी काय खदखद चालली आहे त्याचे चित्र गुजरातमध्ये दिसावे हे दुर्दैवच म्हणायला हवे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत

The condition of the country is like the Deonar Dumping Ground, the criticism of Uddhav Thackeray on BJP | देशाची अवस्था देवनार डंपिंग ग्राऊंडसारखी, उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका

देशाची अवस्था देवनार डंपिंग ग्राऊंडसारखी, उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका

Next
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि, १९ - पटेल आरक्षणाच्या मुद्यावर गुजरातमध्ये सुरु असलेल्या आंदोलनावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर सामना संपादकीयमधून टीका केली आहे. देशाची अवस्था देवनार डंपिंग ग्राऊंडसारखी झाली आहे. वरवर आग विझलेली दिसत असली तरी कचर्‍याच्या ढिगार्‍याखाली धुमसणे सुरूच आहे. त्यामुळे अचानक आगीचे भडके उडत आहेत. फक्त राजकीय छूमंतर किंवा आश्‍वासनांची फवारणी करून या आगीचे लोळ विझणार नाहीत असं मत उद्धव ठाकरेंनी मांडलं आहे.
 
पंतप्रधान मोदी हे जागतिक शांततेची ज्योत घेऊन जगभ्रमण करीत आहेत. देशोदेशीचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांच्याशी हस्तांदोलन किंवा आलिंगन देतानाची छायाचित्रे प्रसिद्ध होत आहेत, पण खुद्द त्यांचे गुजरात पेटले असून पटेल समुदायाने भडका उडवला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मेहसाणामध्येच सगळ्यात जास्त भडका उडाला आहे व तेथे संचारबंदी लागू करून पोलिसी दडपशाही सुरू आहे. हिंदुस्थानातील जनतेच्या मनात नेमकी काय खदखद चालली आहे त्याचे चित्र गुजरातमध्ये दिसावे हे दुर्दैवच म्हणायला हवे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
‘भारतमाता की जय’ म्हणणार नाहीत अशा लोकांची मुंडकी उडवायला हवीत किंवा अशा लोकांना येथे राहण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका अलीकडच्या काळात भाजपने मांडली आहे. पण ‘भारतमाता की जय’ न म्हणणार्‍या लोकांसोबत कश्मीरात सत्ता स्थापन करायची व भारतमातेच्या सुपुत्रांना खोट्या खटल्यात गुंतवून तुरुंगात डांबायचे. हार्दिक पटेलने गुजरातमध्ये आरक्षणाच्या मुद्यावरून हिंसा भडकवली, राज्य सरकारविरोधात चिथावणी दिली म्हणून त्याच्यावर कारवाई होऊ शकते, पण तिरंग्याचा अवमान झाल्याचा ठपका ठेवून देशद्रोहाचा गुन्हेगार ठरवणे कितपत योग्य आहे? भाजपचे ‘हायकमांड’ सरकार स्थापनेसाठी कश्मीरात पाकधार्जिण्या लोकांशी बोलतात, पण गुजरातमध्ये आपल्याच हाडामांसाच्या लोकांशी बोलायला अहंकार आडवा येतो हे चांगल्या राज्यकर्त्याचे लक्षण नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
 
 हार्दिक पटेलच्या सुटकेसाठी गुजरातचा तरुणवर्ग रस्त्यावर उतरला. हाच तरुणवर्ग कालपर्यंत नरेंद्र मोदी व भाजपचा जयजयकार करीत होता. पंतप्रधान मोदी हे जागतिक क्षितिजावर शांतिदूत म्हणून तळपत आहेत. पण ज्या गुजरातमधून त्यांचे नेतृत्व पुढे आले तेथे असंतोषाची आग भडकली आहे. ही आग विझवण्याची जबाबदारी मोदी यांची नसून त्यांच्या पादुका खुर्चीवर ठेवून राज्य करणार्‍यांची आहे. हार्दिक पटेल या नवख्या तरुणाने गुजरातमध्ये आव्हान उभे केले. कन्हैया कुमारसारखे तरुणही आव्हानाची भाषा करू लागले आहेत. शांत डोक्याने विचार करून निर्णय घ्यावा अशी परिस्थिती आहे. त्यासाठी डोक्यातील हवा कमी करून अहंकाराची स्फोटके बाजूला ठेवावी लागतील. हवेने आग भडकते. तसे होऊ नये असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
 

Web Title: The condition of the country is like the Deonar Dumping Ground, the criticism of Uddhav Thackeray on BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.