विस्तारीकरणाला इथेनॉल निर्मितीची अट : सुभाष देशमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2019 07:10 PM2019-07-06T19:10:58+5:302019-07-06T19:15:17+5:30
साखर कारखानदारी सध्या अडचणीच्या काळातून जात असून, कर्जाचा डोंगर वाढत आहे...
पुणे : साखर कारखानदारी अडचणीत असताना काही कारखाने ऊस गाळप क्षमता वाढविण्यासाठी उसाचे क्षेत्र फुगवून सांगत आहेत. जर एखाद्या कारखान्याला विस्तारीकरण करायचे असल्यास त्यांनी साखरेऐवजी क्षमतेच्या निम्मे इथेनॉल निर्मितीची अट घालावी असा पर्याय सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी येथे सुचविला.
दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकच्या वतीने कल्याणी नगर येथील एका हॉटेलमधे आयोजित साखर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी देशमुख बोलत होते. साखर आयुक्त शेखर गायकवाड, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे, वैधमापन शास्त्र विभागाच्या पुणे विभागाच्या उप नियंत्रक सीमा बैस, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, समितीचे सदस्य अविनाश महागावकर या वेळी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, साखर कारखानदारी सध्या अडचणीच्या काळातून जात असून, कजार्चा डोंगर वाढत आहे. कारखानदारीत व्यावसायिकता आणली की, नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारखाने अडचणीत आल्यास, त्यांचे कर्ज खाते असलेल्या बँका देखील अडचणीत येतात. परिणामी दोन्ही संस्था डबघाईला जातात. असे असताना काही कारखाने क्षमता विस्तारीकरण करीत आहेत. विस्तारीकरणाला काही आडकाठी नाही. मात्र, त्यासाठी एकमेकांच्या कारखाना क्षेत्रातील ऊस क्षेत्र आपलेच असल्याचे सांगितले जाते. कोणत्याही कारखान्याने असे क्षेत्र फुगवून सांगू नये.
एखाद्या कारखान्याला क्षमता विस्तार करायचा असल्यास, कारखान्यापासून १५ किलोमीटर अंतरात ८० टक्के उसाच्या उपलब्धतेची अट घातली पाहिजे. तसेच, क्षमतेच्या ५० टक्के इथेनॉल निर्मिती त्या कारखान्याने केली पाहीजे. या अटींच्या आधारावरच संबंधित कारखान्याला विस्तारीकरणाची परवानगी दिली पाहिजे, असे देशमुख म्हणाले.
दर वर्षी मंत्री समितीच्या गाळप हंगामाच्या निर्णयावर साखर परवान्याचे वितरण अवलंबून असते. यंदा दोन महिने आधीच साखर कारखान्यांना कार्यक्रम राबवून एका दिवसांत परवाने दिले जातील. परवाने देताना मंत्री समितीच्या निर्णयानुसार गाळप करावे अशी अट घातली जाईल, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.
----------------------
...तर साखर कारखाना या हंगामात बंद ठेवा : गायकवाड
यंदा राज्यात केवळ ६३ लाख टन साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज आहे. आपल्या आर्थिक स्थितीचा विचार करुन यंदा साखर कारखाना सुरु करावा. तुलनेने कमी ऊस असल्यास एखादे युनिट सुरु ठेवावे, असा सल्ला साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला.