अमरनाथ यात्रेतील जखमींची प्रकृती स्थिर
By admin | Published: July 14, 2017 05:06 AM2017-07-14T05:06:00+5:302017-07-14T05:06:00+5:30
अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या डहाणूतील सात भाविकांची प्रकृती स्थिर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोर्डी : अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या डहाणूतील सात भाविकांची प्रकृती स्थिर आहे. मात्र अद्याप त्यांना शासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही.
गीताबेन रावल यांच्या उजव्या पायाच्या घोट्यात घुसलेली गोळी जम्मूच्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या शस्त्रक्रियेत काढली होती. मात्र गोळीचा काही भाग आतमध्ये असल्याचे एक्सरेद्वारे लक्षात आल्यानंतर शस्त्रक्रियेद्वारे तो काढण्यात यश आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्या श्रद्धा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. योगिता व यशवंत डोंगरे यांच्यावर सूरतच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यशवंत यांच्या कमरेतील गोळी काढली आहे.तर भाग्यामणी ठाकूर यांच्यावरही उपचार सुरू आहेत.
मृत भाविकांच्या कुटुंबीयाकडे शासनाने १० लाखांचा धनादेश सुपूर्त केला परंतु जखमींना कोणतीही मदत जाहीर झालेली नाही. त्यामुळे यात्रेच्या निमित्ताने झालेला खर्च शिवाय या जखमांवर होणारा महागडा वैद्यकीय खर्च त्यांना परवडणारा नाही. त्यामुळे शासनाने तातडीची मदत जाहीर करणे आवश्यक आहे. या हल्यात डोक्याला मार लागलेले प्रकाश वजाणी जखमी असून ते घरीच उपचार घेत आहेत.
केंद्र शासन व जम्मू काश्मीर सरकारकडून जखमींना मदत दिली जाणार आहे. या बाबत जखमींचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत, असे पालघरचे निवासी उप जिल्हाधिकारी नवनाथ जरे यांनी सांगितले.
घोडा यांच्याकडून विचारपूस
कासा : पालघरचे आमदार अमित घोडा बुधवारी सुरतला गेले व तेथील सिव्हिल रुग्णालयात जाऊन त्यांनी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या कासा येथील यशवंत व योगीता डोंगरे यांची विचारपूस केली.