जंतनाशकाने विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली
By Admin | Published: February 11, 2016 01:42 AM2016-02-11T01:42:52+5:302016-02-11T01:42:52+5:30
राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त वाटलेल्या गोळ्या घेताच अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील शाळेतील ७० विद्यार्थ्यांची
मोर्शी/पोफाळी : राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त वाटलेल्या गोळ्या
घेताच अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील शाळेतील ७० विद्यार्थ्यांची आणि यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील जिल्हा परिषद शाळेतील आठ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. यामुळे पालकवर्ग चांगलाच धास्तावला आहे.
शासनाने जंतनाशक दिनानिमित्त सर्व शाळांमध्ये सरकारी दवाखान्यांमार्फत ‘अलबेन्डाझोल’ गोळ्यांचे वाटप केले होते. मोर्शीतील शिवाजी कन्या शाळेत दुपारच्या सत्रात मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्यांना जेवणानंतर गोळ्या दिल्या. त्यानंतर लगेच त्या विद्यार्थ्यांचे पोट दुखू लागले. उलट्या होऊ लागल्या.
विद्यार्थ्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात
आले. ही घटना वाऱ्यासारखी
शहरात पसरली. शेकडो लोकांनी दवाखान्यात गर्दी केली होती. नगर परिषदेच्या एका शिक्षकालासुद्धा ही गोळी घेतल्यानंतर अत्यवस्थ वाटू लागले.
प्रत्येक शाळेत ही गोळी विद्यार्थ्यांना चावून खाण्यास सांगितले. परंतु १५ वर्षे वयोगटाच्या आतील मुलांना ही गोळी
पचली नसावी, असा अंदाज
या घटनेत व्यक्त होत आहे. या प्रकरणाची पालकमंत्री प्रवीण
पोटे यांनी गंभीर दखल घेतली
असून वस्तुस्थितिदर्शक अहवाल तातडीने सादर करण्याचे
आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले यांना दिले
आहेत. (प्रतिनिधी)