रेल्वेमंत्र्यांची प्रकृती खालावली, उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 09:59 PM2017-11-27T21:59:51+5:302017-11-27T22:40:26+5:30
मुंबई- मुंबईच्या दौऱ्यावर असलेले रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची तब्येत अचानक खालावली आहे. त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मुंबई- मुंबईच्या दौऱ्यावर असलेले रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची तब्येत अचानक खालावली आहे. त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पीयूष गोयल एलफिन्स्टन पुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी सध्या मुंबईत आले आहेत. एलफिन्स्टन पुलाच्या कामाच्या पाहणीनंतर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी पत्रकार परिषद घेणार होते. संध्याकाळी 6.30 वाजता ही पत्रकार परिषद नियोजित होती. मात्र तत्पूर्वीच त्यांच्या पोटात दुखू लागल्यामुळे त्यांना येथील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एलफिन्स्टन पुलाच्या कामाच्या पाहणी दौ-यानंतर गोयल यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली होती. बैठकीदरम्यानच त्यांना पोटदुखीचा प्रचंड त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना बैठक अर्ध्यावरच सोडून ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोयल यांना बोलतानाही काहीसा त्रास होत असतानाच अचानक ही पोटदुखी उफाळून आली. त्यांच्या पोटात असह्य वेदना होऊ लागल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
रेल्वेमंत्र्यांसह एलफिन्स्टन पुलाच्या बांधकामाची पाहणी केल्याचीही माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, कामाचा वेग कसा आहे, नेमके काम कुठवर आले ?, काम वेळेत पूर्ण होईल की नाही याचा आढावा रेल्वेमंत्र्यांनी दुपारच्या वेळी घेतला. दिलेल्या वेळेच्या आधी हा पूल पूर्ण होईल याची आम्हाला खात्री आहे, अशी माहिती पीयूष गोयल यांनी दिली आहे. मात्र यानंतर जेव्हा ते रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते, तेव्हा त्यांना अचानक त्रास होऊ लागला. सध्या त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचीही माहिती समजते आहे.