आमदार निधीच्या कामाची अट शिथील
By admin | Published: July 15, 2016 03:31 AM2016-07-15T03:31:17+5:302016-07-15T03:31:17+5:30
आमदार व खासदार निधीतून १० लाख रुपयांपर्यंतची कामे यापुढे ई टेंडरशिवाय करता येतील, वित्त विभागाने गुरुवारी यासंदर्भातील आदेश जारी केला.
मुंबई : आमदार व खासदार निधीतून १० लाख रुपयांपर्यंतची कामे यापुढे ई टेंडरशिवाय करता येतील, वित्त विभागाने गुरुवारी यासंदर्भातील आदेश जारी केला.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी राज्य सरकारमधील तीन लाख रुपयांपेक्षा अधिकचे कोणतेही काम ई टेंडरनेच करावे, असा आदेश काढला होता. तथापि आमदार निधीतील कामांसाठी तीन लाखांची मर्यादा ठेऊ नये, ती दहा लाख रुपयांपर्यंत वाढवावी, अशी सर्व पक्षीय आमदारांची मागणी होती. या मागणीचा विचार करण्यासाठी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती मुख्यमंत्र्यांनी नेमली होती. या समितीने आमदार निधीतील दहा लाख रुपयांपर्यंतची कामे ई टेंडरशिवाय करावीत, अशी शिफारस केली होती. ती राज्य सरकारने स्वीकारली आहे. आमदार निधी व्यतिरिक्तच्या कामांसाठी मात्र पूर्वीप्रमाणेच तीन लाखांची अट कायम राहणार आहे.या निर्णयामुळे आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. (विशेष प्रतिनिधी)