पुनामियाच्या मोबाइलमध्ये गृहविभागाची गोपनीय फाईल, बिल्डरची तक्रार; सायबर पोलिसांकडून तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 08:55 AM2021-11-27T08:55:23+5:302021-11-27T09:02:04+5:30
या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडून (एसआयटी) सुरू करण्यात आला होता. यादरम्यान एसआयटीच्या चौकशीत पुनामियाच्या व्हॉटस्ॲप चॅटमधून धक्कादायक माहिती समोर आली.
मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आणि खंडणीच्या गुह्यात अटकेत असलेले संजय पुनामिया यांच्या मोबाइलमध्ये गृहविभागातील २७ पानांची गोपनीय फाईल सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मध्य विभाग सायबर सेलने स्वतंत्र गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. परमबीर सिंहांना गुन्ह्यात मदत करण्यासाठी ही फाईल चोरल्याचा संशय पोलिसांना आहे.
भाईंदर येथील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सिंह यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण, पोलीस अधिकारी श्रीकांत शिंदे, पीआय आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, खासगी इसम सुनील जैन आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यात जैन आणि पुनामिया यांना अटक झाली आहे.
या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडून (एसआयटी) सुरू करण्यात आला होता. यादरम्यान एसआयटीच्या चौकशीत पुनामियाच्या व्हॉटस्ॲप चॅटमधून धक्कादायक माहिती समोर आली. ३ मे २०२१ रोजी पुनामियाने २७ पानांची फाईल त्यांचा मुलगा सनी पुनामिया याला मोबाइलवरून पाठविल्याचे समोर आले. गृहविभागाच्या या फाईलमध्ये गोपनीय असा शेरा होता. त्यामुळे माहिती अधिकारातही अशी फाईल उपलब्ध होणे शक्य नसल्यामुळे पुनामियाने ही फाईल चोरल्याचा संशय आहे.
फाईलमध्ये काय आहे?
या फाईलमध्ये काही पत्रव्यवहार झाल्याच्या गोपनीय कागदपत्रांचा समावेश आहे. या पत्रव्यहारामध्ये पोलीस अधीक्षक, सीबीआय, नवी दिल्ली यांनी गृहविभाग आणि महाराष्ट्र पोलीस महासंचालक यांना एका चौकशीसंबंधित माहिती मागविली होती. ८ एप्रिल आणि १५ एप्रिलच्या दोन पत्रांचा यात समावेश आहे. यावर ९ एप्रिल आणि १८ एप्रिलदरम्यान गृहविभागाने पत्रव्यवहार केला आहे. यामध्ये कागदपत्रांवर गोपनीय असा शेरा आहे. त्यामुळे एका चौकशी प्रकरणातील गोपनीय कागदपत्रे लीक कशी झाली, याबाबत अधिक तपास सुरू आहे.