कॉलेजचे होणार गोपनीय निरीक्षण
By admin | Published: May 20, 2014 03:54 AM2014-05-20T03:54:04+5:302014-05-20T03:54:04+5:30
राज्य सरकारने विद्यापीठाशी संलग्नित सर्व अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांचे निरीक्षण करण्याचे आदेश उच्च शिक्षण विभागाला दिले आहे.
आशिष दुबे, नागपूर - राज्य सरकारने विद्यापीठाशी संलग्नित सर्व अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांचे निरीक्षण करण्याचे आदेश उच्च शिक्षण विभागाला दिले आहे. या निरीक्षणातून नियमांना डावलून सुरू असलेल्या महाविद्यालयांचा भोंगळ कारभार पुढे येणार आहे. अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, एमबीए, लॉ, फार्मसी महाविद्यालयांची तपासणी होणार आहे. या तपासणीसाठी समित्यांचे गठन करण्यात आले आहे. यात शासकीय महाविद्यालयातील शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यापीठाचे सदस्य अथवा पदाधिकार्यांना या तपासणीपासून दूर ठेवण्यात आले आहे. या तपासात समितीने नोंदविलेल्या माहितीला गोपनीय ठेवण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासाची विस्तृत माहिती विभागीय सहनिदेशकांना देण्यात येणार आहे. सहनिदेशकांकडून संपूर्ण माहिती निदेशक कार्यालयाला पाठवली जाईल व निदेशक कार्यालय विस्तृत रिपोर्ट राज्य सरकारला सुपूर्द करेल. यासंदर्भात विभागीय सहसंचालक डॉ. डी. बी. पाटील यांच्या नेतृत्वात शासकीय विज्ञान संस्थेत विभागातील सर्व शासकीय महाविद्यालयाच्या शिक्षकांची एक बैठक पार पडली. या बैठकीत सर्व शिक्षकांना सरकारने दिलेल्या आदेशाची माहिती देण्यात आली. शिक्षकांना निरीक्षणाचे प्रारूप देण्यात आले. यात २४ मुद्दे दिले आहेत. निरीक्षणाचे काम २० दिवसांत पूर्ण करायचे आहे.