‘उच्च रक्तदाबा’चा ग्रामीण भागांना विळखा
By Admin | Published: May 17, 2016 03:01 AM2016-05-17T03:01:15+5:302016-05-17T03:01:15+5:30
पुणे-शुद्ध व खेळती हवा, निसर्गसंपन्न परिसर ही गावाकडची ओळख.
नम्रता फडणीस,
पुणे-शुद्ध व खेळती हवा, निसर्गसंपन्न परिसर ही गावाकडची ओळख. मात्र या भागांमध्येही आता शहरीकरण झपाट्याने सुरू झाल्याने ही ओळख काहीशी पुसली गेली आहे. बदलती जीवनशैली, फास्टफूडचे सेवन या कारणांमुळे आता ग्रामीण भागातील लोकांनाही उच्च रक्तदाबाचा विळखा पडू लागला असल्याची बाब एका पाहणीद्वारे समोर आली आहे. विशेष म्हणजे महिलांपेक्षा पुरुषांमध्ये रक्तदाबाचे प्रमाण अधिक असून, बहुतांश व्यक्ती आपल्याला ‘रक्तदाबा’चा त्रास आहे, याबाबतच अनभिज्ञ आहेत!
सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या इंटरडिसिप्लरी स्कूल आॅफ हेल्थ सायन्सेस’ विभागामध्ये एमएस्सी करणाऱ्या सोफिया अहमद आणि डॉ. अमित मेश्राम या विद्यार्थ्यांनी पुणे जिल्ह्यातील कामशेतजवळील पाथरगाव, नाणेगाव, नायगाव, चिखलसे आणि कुसगाव या पाच गावांमध्ये सायलंट किलर समजल्या जाणाऱ्या ‘रक्तदाब’ या विकाराबाबत पाहणी केली. त्यासंदर्भात ‘अ स्टडी टू डिटरमाईन आॅफ रेजड ब्लड प्रेशर अँड असोसिएटेड रिस्क फॅक्टर्स इन अ रूरल एरिया आॅफ पुणे डिस्ट्रिक्ट’ या विषयावर नुकताच संशोधनात्मक प्रबंध सादर केला आहे. यासाठी केईम रिसर्च संशोधन विभागाचे डॉ. सुदिप्तो रॉय यांचे मार्गदर्शन लाभले.
या पाहणीविषयी सांगताना सोफिया अहमद ‘लोकमत’शी बोलताना म्हणाली, की कामशेतजवळ ३८ गावं आहेत, त्यातील पाच गावांची निवड आम्ही केली, त्यानुसार त्यातील २२६ व्यक्तींची (स्त्री व पुरुष) वैयक्तिक आरोग्य तपासणी करण्याबरोबरच जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार डाएट, मास इंडेक्स, व्यसन, उंची, वजन, शारीरिक हालचाली यांबाबत एक प्रश्नावली भरून घेण्यात आली.
यामधून समोर आलेल्या निष्कर्षानुसार ६६ व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे दिसले, म्हणजे या भागात रक्तदाबाचे प्रमाण हे २९.२ टक्के इतके आहे. त्यामध्ये पुरुषांचे प्रमाण हे सर्वाधिक म्हणजे ४९.२ टक्के तर महिलांचे प्रमाण हे २१.२ टक्के आहे.