ओखी वादळग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे,नियमानुसार मदत देण्याची ग्वाही: चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 03:15 AM2017-12-19T03:15:03+5:302017-12-19T03:15:18+5:30
राज्यातील ओखी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या आपद्ग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू आहे. नियमानुसार त्यांना मदत देण्यात येईल, असे महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.
नागपूर : राज्यातील ओखी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या आपद्ग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू आहे. नियमानुसार त्यांना मदत देण्यात येईल, असे महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.
आ. जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना पाटील म्हणाले, राज्यातील विशेषत: रायगड, रत्नागिरी, नाशिक जिल्ह्यात ओखी वादळामुळे नुकसान झालेले आहे. रायगड जिल्ह्यात रब्बी हंगामात सुमारे ३०० हेक्टर क्षेत्रावरील पेरणी झालेल्या कडधान्य व भाजीपाला पिकांचे प्राथमिक अहवालानुसार नुकसान झाले आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ओखी चक्रीवादळामुळे रत्नागिरी तालुक्यातील जाकीमिºया येथील ५२ मच्छिमारांची जाळी वाहून गेल्याने अंदाजे ४३.२६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यासंबंधी सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय रत्नागिरी यांच्यामार्फत पंचनामे करण्यात येत आहेत. नाशिक जिल्ह्यातील नाशिक, निफाड, दिंडोरी, चांदवड व सटाणा या तालुक्यात ओखी चक्रीवादळामुळे प्राथमिक अहवालानुसार सुमारे १ हजार ३६ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष व इतर पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. यासोबतच वादळामुळे राज्यातील नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.