अविश्वासाच्या वातावरणात ‘विश्वास’ मंजूर, विरोधक पक्षांची राज्यपालांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 05:22 AM2018-03-24T05:22:22+5:302018-03-24T05:22:22+5:30
विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर विरोधी पक्षांनी दिलेल्या अविश्वास ठरावावर निर्णय होण्याआधीच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारीे अध्यक्षांवर विश्वासदर्शक ठराव मांडून शिवसेनेच्या साहाय्याने आवाजी मतदानाने मंजूरही करवून घेतला. सत्तापक्षाच्या या कृतीने लोकशाहीचा खून झाला असून, आम्ही यापूर्वी दाखल केलेला अविश्वास ठराव डावलण्यात आल्याची तक्रार विरोधकांनी राज्यपालांकडे केली आहे.
मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर विरोधी पक्षांनी दिलेल्या अविश्वास ठरावावर निर्णय होण्याआधीच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारीे अध्यक्षांवर विश्वासदर्शक ठराव मांडून शिवसेनेच्या साहाय्याने आवाजी मतदानाने मंजूरही करवून घेतला. सत्तापक्षाच्या या कृतीने लोकशाहीचा खून झाला असून, आम्ही यापूर्वी दाखल केलेला अविश्वास ठराव डावलण्यात आल्याची तक्रार विरोधकांनी राज्यपालांकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना गाफील ठेवून, अचानक अध्यक्षांवर चार ओळींचा विश्वासदर्शक ठराव आणला. शिवसेनेचे सभागृह नेते एकनाथ शिंदे यांनी त्यास अनुमोदन दिले. तालिका अध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी चर्चेविना तो मतदानास टाकला आणि विरोधकांच्या गोंधळात
तो आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.
त्यानंतर, विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज तहकूब करण्यात आले. पुन्हा कामकाज सुरू होताच, भाजपाच्या सदस्यांनी ‘भारत माता की जय’ अशा जोरदार घोषणा सुरू केल्या. काँग्रेस, राष्ट्रवादीचे सदस्य शांत होते. तालिका अध्यक्षांनी कामकाज पुन्हा तहकूब केले. ते पुन्हा सुरू होताच, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील बोलायला उभे राहिले व विरोधकांचा अध्यक्षांवरील अविश्वास ठराव वाचू लागताच मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलण्यापासून रोखले.
विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे यांनी अध्यक्षांवरील अविश्वासदर्शक ठरावाची कार्यपद्धती वाचून दाखविण्यास सुरुवात केली. त्यावर मंत्री गिरीश बापट यांनी हरकत घेत, तोच विषय पुन्हा मांडता येणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर, सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी विरोधकांचा धिक्कार करत घोषणाबाजी केली. गदारोळात तालिका अध्यक्ष अशोक साबणे यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. त्यानंतर सत्ताधारी बाकावरील सदस्य निघून गेले. मात्र, विरोधी बाकावरील सर्व सदस्य विधानसभेत, तसेच सायंकाळी
४ वाजेपर्यंत ठाण मांडून होते.
राज्यपालांसमोर मांडली कैफियत
विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने सायंकाळी राजभवनावर जाऊन राज्यपाल सी.विद्यासागर राव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. विरोधकांचा हक्क डावलून अचानक विश्वासदर्शक ठराव आणणे ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप विरोधकांनी केला आणि तशी कैफियत त्यांनी राज्यपालांसमोर मांडली.
सत्ताधाऱ्यांनी गोंधळ करून कामकाज उरकून घेणे ही लोकशाहीला काळिमा फासणारी गोष्ट आहे. सभागृहात मंत्री येत नाहीत, लक्षवेधीची उत्तरे आली नाही, म्हणून कामकाज पुढे ढकलले जाते.
- दिलीप वळसे पाटील, माजी अध्यक्ष, विधानसभा
आम्ही कायदा सुव्यवस्थेवर चर्चा करणार होतो. सरकारच्या कारभाराचे आम्ही धिंडवडे काढले असते, पण ते सरकारला नको होते, म्हणून सरकारने कामकाज गुंडाळले. बहुमत असूनही सरकार मतदानास घाबरले.
- राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा