वनिता गायकवाडचा मृतदेह पुरल्याची कबुली
By Admin | Published: August 19, 2016 12:39 AM2016-08-19T00:39:32+5:302016-08-19T00:39:32+5:30
राज्याला हादरवून सोडणाऱ्या वाई हत्याकांडप्रकरणातील वनिता नरहरी गायकवाड यांचा मृतदेह कृष्णा नदीत टाकला नसून धोम धरणाच्या परिसरातच पुरल्याची नवी माहिती
सातारा/वाई : राज्याला हादरवून सोडणाऱ्या वाई हत्याकांडप्रकरणातील वनिता नरहरी गायकवाड यांचा मृतदेह कृष्णा नदीत टाकला नसून धोम धरणाच्या परिसरातच पुरल्याची नवी माहिती सिरीयल किलर संतोष पोळ याने दिली आहे. या खुनांशी संबंधित रुग्णवाहिकाही मुंबईत जप्त करण्यात आली आहे.
पोळने केलेल्या हत्याकांडातील वनिता गायकवाड यांचा मृतदेह मिळाला नव्हता. पोळच्या या नव्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला आहे. दरम्यान, आजपर्यंत आरोपी संतोष पोळशी संपर्कात येऊन गायब झालेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांचा ओघ पोलीस ठाण्यात सुरूच आहे.
पोळची सात दिवसांची पोलीस कोठडी शुक्रवारी संपणार आहे़ मात्र, आता त्याच्यावर मंगल जेधे व्यतिरिक्त नवीन पाच खुनांचे वेगवेगळे गुन्हे दाखल झाल्याने प्रत्येक प्रकरणात पोलीस त्याला न्यायालयात हजर करतील. त्यामुळे पोलिसांच्या तपासाला अधिक वेळ मिळणार असला तरी खुनामागचे खरे कारण आणि पुरावे शोधणे हे आव्हानात्मक काम पोलिसांसमोर आहे. संतोष पोळने डॉक्टर घोटवडेकर यांच्या नावावर असलेली रुग्णवाहिकाही गावातील एका व्यक्तीला करार करून भाड्याने दिली आहे़ या रुग्णवाहिकेचा विविध प्रकारच्या गुन्ह्यात वापर केला असण्याची शक्यता असल्याने वाई पोलिसांनी रुग्णवाहिका ताब्यात घेऊन मुंबई येथील एका पोलीस स्टेशनला आणून लावली आहे. (प्रतिनिधी)