सत्तेसाठी करावी लागणार अपक्षांची मनधरणी
By Admin | Published: February 27, 2017 01:04 AM2017-02-27T01:04:33+5:302017-02-27T01:04:33+5:30
मिनी विधानसभा समजली जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत हवेली तालुक्यातील १३ गटांपैकी ८ जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय प्राप्त केला
लोणी काळभोर : मिनी विधानसभा समजली जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत हवेली तालुक्यातील १३ गटांपैकी ८ जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय प्राप्त केला असून, पंचायत समितीच्या २६ पैकी १३ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने पटकावल्या. असे असले, तरी हवेली पंचायत समितीवर आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी त्यांना एका जागेची कमतरता असल्याने अपक्षांची मनधरणी करावी लागणार आहे. भाजपाने हवेलीमध्ये जिल्हा परिषदेच्या ३ जागा व पंचायत समितीच्या ६ जागा मिळवून आपले खाते उघडले असून, शिवसेना व अपक्षांना प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
थेऊर-लोणी काळभोर गटातून राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने बंडखोर अपक्ष उमेदवार लोणी काळभोरचे माजी सरपंच चंदर शेलार यांच्या मातोश्रीनी धक्कादायक विजयाची नोंद केली. त्यांनी राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार व राष्ट्रवादी काँगे्रसचे ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत गवळी यांच्या पत्नी अनिता गवळी यांचा पराभव केला. लोणी काळभोर गणांत हवेली खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे तुल्यबळ उमेदवार प्रशांत काळभोर यांचा पराभव माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर यांचे पुतणे व प्रथमच निवडणुकीस सामोरे गेलेले अपक्ष उमेदवार सनी ऊर्फ युगंधर काळभोर यांनी मोठ्या फरकाने पराभव केल्याने याठिकाणी मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी आपल्या गटातील वर्चस्व कायम ठेवत पेरणे वाडेबोल्हाई गट व गणातून आपले उमेदवार निवडून आणले आहेत. या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संदीप भोंडवे यांनी सर्वपक्षीय आघाडीच्या माध्यमातून आव्हान उभे करूनही जयश्री भोंडवे यांना पराभव पत्कारावा लागला आहे. पेरणे व वाडेबोल्हाई या दोन्ही गणांत राष्ट्रवादी काँगे्रसच्या संजीवनी कापरे व राजेंद्र पठारे हे विजयी झाले आहेत.
उरूळी कांचन- सोरतापवाडी गट व दोन्ही गण राष्ट्रवादी काँग्रेसने अबाधित ठेवले. जिल्हा परिषदेचे माजी आदर्श सदस्य व यशवंतचे माजी संचालक महादेव कांचन यांना मतदारांनी चांगलाच हिसका दिला असून, भाजपामधून निवडणूक लढवणाऱ्या त्यांच्या स्नुषा ऋतुजा कांचन यांना पराभवाची चव चाखावी लागली आहे. येथून राष्ट्रवादीच्या कीर्ती अमित कांचन यांनी बाजी मारली आहे. सोरतापवाडी गणातील भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पूनम चौधरी यांनाही पराभवास सामोरे जावे लागले आहे. याठिकाणी वैशाली गणेश महाडीक यांनी जोरदार मुसंडी मारत विजय खेचून आणला. उरुळी कांचन गणातून राष्ट्रवादीच्या हेमलता बडेकर यांनीही चुरशीच्या लढतीत विजय प्राप्त केला. फुरसुंगी-कदमवाकवस्ती गटात राष्ट्रवादीच्या अर्चना कामठे यांनी विद्यमान पंचायत समिती सदस्या व भाजपाच्या उमेदवार गौरी गायकवाड यांना पराभूत केले. कदमवाकवस्ती गणात राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने भाजपाकडून उमेदवारी मिळवलेले अनिल टिळेकर यांनी आपल्या दांडग्या जनसंपर्काच्या जोरावर विजय मिळवला. त्यांनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष नंदू काळभोर यांच्या मातोश्री व कदमवाकवस्तीच्या माजी सरपंच बेबीताई काळभोर यांचा पराभव केला. तर, फुरसुंगी गणात शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश करून लढलेल्या विद्यमान पंचायत समिती सदस्या रोहिणी राऊत यांनी शिवसेनेच्या रेखा हरपळे यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश घुले यांनी आपले वर्चस्व कायम ठेवत मांजरी शेवाळवाडी गट व गणातून आपले उमेदवार निवडून आणले आहेत. गटातून दिलीप परशुराम घुले, गणातून अजिंक्य घुले व दिनकर हरपळे यांनी विजय प्राप्त केला. देहू-लोहगाव या गटांत राष्ट्रवादीच्या मंगल जंगम, तर दोन्ही गणांत राष्ट्रवादीच्याच हेमलता काळोखे व सुजाता ओव्हाळ यांनी विजय मिळवला. वाघोली-आव्हाळवाडी हा गट व गणात शिवसेनेने भगवा फडकावला या गटात ज्ञानेश्वर कटके यांनी भाजपाच्या रामदास दाभाडे यांचा पराभव केला, तर गणात सर्जेराव वाघमारे व नारायण आव्हाळे यांनी विजय मिळवला. धायरी - नांदेड या गणांसह दोन्ही गणात भाजपाचे उमेदवार विजयी झाले. (वार्ताहर)
>सभापतीपद खुल्या वर्गासाठी राखीव
हवेली पंचायत समितीचे सभापतिपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. आपली सत्ता अबाधित राहावी म्हणून दोनपैकी एक अपक्षाची मदत घेणे राष्ट्रवादीला गरजेचे आहे. यांमध्ये कोंढवे-धावडे गणातून बाळासो मोकाशी व लोणी काळभोर - आळंदी म्हातोबाची गणातून सनी ऊर्फ युगंधर काळभोर हे दोघे निवडून आलेले असून, मोकाशी हे शिवसेना, तर काळभोर हे राष्ट्रवादीच्या विचारांचे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस उपसभापतिपदाचा मोबदला देऊन काळभोर यांना आपल्याकडे ओढतील अशा चर्चेने पूर्व हवेलीत जोर धरला आहे.