शिवसेनेच्या दोन्ही गटांनी टाळला संघर्ष; सभागृहात गोंधळ घातला नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 08:25 AM2022-07-04T08:25:29+5:302022-07-04T08:26:25+5:30

तणावाऐवजी शांतता, शिवसेनेत आजवर झालेल्या सर्वात मोठ्या बंडाच्या पार्श्वभूमीवर आजचे अधिवेशन होत असतानाही विभागल्या गेलेल्या शिवसेनेच्या दोन गटांमध्ये एकाही प्रसंगात हमरीतुमरी झाली नाही.

Conflict avoided by both Shiv Sena groups; There was no commotion in the hall | शिवसेनेच्या दोन्ही गटांनी टाळला संघर्ष; सभागृहात गोंधळ घातला नाही

शिवसेनेच्या दोन्ही गटांनी टाळला संघर्ष; सभागृहात गोंधळ घातला नाही

Next

मुंबई : विधानसभेच्या विशेष अधिवेशनात पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट आमनेसामने येऊन तणाव निर्माण होईल, असे म्हटले जात असताना दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी संघर्ष, वाद करण्याचे टाळले. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक शांततेच्या वातावरणात पार पडली. 

शिवसेनेत आजवर झालेल्या सर्वात मोठ्या बंडाच्या पार्श्वभूमीवर आजचे अधिवेशन होत असतानाही विभागल्या गेलेल्या शिवसेनेच्या दोन गटांमध्ये एकाही प्रसंगात हमरीतुमरी झाली नाही. सभागृहाच्या बाहेर वा सभागृहातही दोन्ही गटांतील आमदारांनी एकमेकांशी कोणताही संवाद साधला नाही. इतक्या वर्षांमध्ये दोन्ही बाजूंचे आमदार एकाच पक्षात एकाच नेतृत्वाखाली काम करीत होते. इतक्या वर्षांचा ऋणानुबंध राहिला आहे, पण आज दोन गटांतील आमदार एकमेकांशी बोलणे तर सोडाच, पण बघतदेखील नव्हते. शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार आणि भाजपचे सगळे आमदार भगवे फेटे घालून आले होते. जय भवानी, जय शिवाजी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, जय श्रीरामच्या घोषणा शिंदे गट आणि भाजपचे आमदार देत होते. त्या मानाने ठाकरे गटातील आमदार शांत बसले होते. तीन तासांच्या अधिवेशनात तावातावाने एकदाच बोलले ते शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव. मात्र, समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांनी औरंगाबाद व उस्मानाबादचे नामांतर केल्याबद्दल टीका सुरू केल्याने जाधव भडकले. त्या वादाला शिवसेनेतील वादाचा संदर्भ नव्हता. दोन्ही गटांतील आमदार वेलमध्ये उतरले, एकमेकांच्या अंगावर धावून गेले असा कोणताही प्रसंग उद्भवला नाही. 

सत्तांतर नाट्यानंतर प्रथमच आमने-सामने    
शिवसेनेत गेले काही दिवस प्रचंड तणाव आहे. इतके दिवस बाहेर असलेले शिंदे गटाचे आमदार मुंबईत परतल्यानंतर आज पहिल्यांदाच ठाकरे गटाच्या आमदारांसमोर आले, पण दोन्ही बाजूंनी मर्यादांचे पालन करत सभागृहातील वातावरण बिघडू दिले नाही. बाहेर कितीही वाद असले तरी त्याचे पडसाद सभागृहात उमटणार नाही याची काळजी दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी घेतली.

Web Title: Conflict avoided by both Shiv Sena groups; There was no commotion in the hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.