विरोधकांच्या प्रस्तावात परस्पर काटछाट
By Admin | Published: December 18, 2015 02:43 AM2015-12-18T02:43:49+5:302015-12-18T02:43:49+5:30
विधानसभेत विरोधी पक्षाने दिलेल्या २९३ च्या प्रस्तावात विरोधकांना अंधारात ठेवून बदल केले गेले. त्याचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले. विरोधकांनी कसे काम करायचे
नागपूर : विधानसभेत विरोधी पक्षाने दिलेल्या २९३ च्या प्रस्तावात विरोधकांना अंधारात ठेवून बदल केले गेले. त्याचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले. विरोधकांनी कसे काम करायचे हे देखील आता सरकार ठरवणार आहे का? असा सवाल विरोधकांनी केला मात्र त्यात म्हणावी तशी तीव्रता नव्हती. त्यातून सभागृहात काही काळ तणाव निर्माण झाला खरा, पण शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.
गुरुवारचा दिवस विरोधकांचा असतो. त्यादिवशी विरोधक त्यांना हवा तो प्रस्ताव मांडतात. त्यानुसार राधाकृष्ण विखे, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम या बड्या नेत्यांनी एकत्रितपणे विदर्भ व मराठवाड्यातील सिंचनाचा वाढता अनुशेष, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सिंचन प्रकल्पांना मान्यता न मिळणे असा विषय चर्चेला आणला होता. त्यासोबतच गोसीखुर्द. बेंबळा, लोअर वर्धा, अप्पर वर्धासारखे प्रकल्प अद्याप पूर्ण झाले नसल्याचा विषयही चर्चेला दिला होता. मात्र सकाळी कामकाज पत्रिका पाहून विरोधकांना धक्काच बसला.
आपण दिलेल्या प्रस्तावात काटछाट झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. कोणाला विचारून हे केले गेले याची शहानिशा झाली; पण कोणालाच विचारले गेले नाही हे लक्षात येताच विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा विषय थेट सभागृहात काढला.
पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार हे देखील यावर संतप्त झाले. आम्हाला न सांगता परस्पर विरोधकांच्या प्रस्तावात अशी काटछाट होते कशी?, असे होत असेल तर या कामकाजाला अर्थ तरी काय उरला असा थेट सवाल अजित पवार यांनी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना केला. तर विरोधकांनी काय बोलायचे आणि काय नाही हे सरकार ठरवणार आहे का? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
अध्यक्ष बागडे यांनी, तीन-चार विभागांचा समावेश असल्याने काही विभाग व चर्चेत येऊन गेलेले विषय वगळले असतील. विरोधकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असेल, पण तो झाला नसेल. पण तुम्ही तुमच्या विषयावर बोला असे सांगूून चर्चा पुढे चालवण्याचा प्रयत्न केला.
शेवटी शालेय शिक्षणमंत्री तावडे यांनी जे विषय वगळले आहेत त्यातले कोणते घ्यायचे आणि कोणते नाही, यासाठी अध्यक्षांच्या दालनात बैठक घ्या आणि ठरवा असे सांगून पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांचा प्रस्ताव कापला कोणी याचे उत्तर शेवटपर्यंत विरोधकांना मिळाले नाही, त्यांनीही ते जाणून घेण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. ( विशेष प्रतिनिधी)