कोपर्डीतील क्रूरतेचे विधिमंडळात पडसाद

By admin | Published: July 19, 2016 05:29 AM2016-07-19T05:29:07+5:302016-07-19T05:29:07+5:30

कोपर्डी (ता.कर्जत ) येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार आणि हत्येचे राज्यात विविध ठिकाणी व विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात तीव्र पडसाद उमटले.

Conflict Resolution in the Criminal Procedure Code | कोपर्डीतील क्रूरतेचे विधिमंडळात पडसाद

कोपर्डीतील क्रूरतेचे विधिमंडळात पडसाद

Next

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी (ता.कर्जत ) येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार आणि हत्येचे राज्यात विविध ठिकाणी व विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात तीव्र पडसाद उमटले. विरोधकांनी अत्यंत आक्रमक होत या घटनेप्रकरणी स्थगन प्रस्ताव स्वीकारून तातडीने चर्चा करावी, अशी मागणी केली. मात्र, ती फेटाळण्यात आली. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविला जाईल. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम मांडतील, असे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी चर्चेची मागणी केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनीही इतर सगळे कामकाज बाजूला सारून महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणाऱ्या या घटनेवर चर्चेची मागणी लावून धरली. अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी स्थगन प्रस्ताव अमान्य केला. मात्र, या घटनेवर सभागृहात अन्य आयुधाद्वारे चर्चा केली जाईल, असे सांगत मुख्यमंत्र्यांना निवेदन करण्यास अनुमती दिली. मुख्यमंत्री म्हणाले की, १३ जुलैला ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी गुन्हे दाखल केले. आतापर्यंत तीन आरोपींना अटक झाली आहे. त्यांना कठोर शिक्षा व्हावी ही सरकारची भूमिका असेल. मात्र केवळ निवेदन नको, असे म्हणत विरोधक आक्रमक झाले. (विशेष प्रतिनिधी)
>राज्यभर निषेध .... कोपर्डी प्रकरणाचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले. अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, बुलडाणा आदी जिल्ह्यात निषेध मोर्चे काढण्यात आले, तर काही ठिकाणी बंद पाळण्यात आला. संभाजी ब्रिगेड, छावा, मराठा महासंघ, जिजाऊ ब्रिगेडसह विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली.
>आठ लाखांची मदत
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पीडित मुलीच्या कुटुंबास ५ लाख रुपये तर मनोधैर्य योजनेतून तीन लाख रुपयांची मदत तातडीने दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्या कुटुंबास आणि साक्षीदारांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
कठोर कायदा करा : अजित पवार
मुख्यमंत्र्यांनी केवळ निवेदन देऊन संपविण्यासारखा कोपर्डीचा विषय नाही. आज लोकप्रतिनिधी म्हणवून घ्यायला लाज वाटते. तुमच्या आमच्या घरातील मुलगी समजा आणि तातडीने कारवाई करा, बलात्कार करण्याची कोण्या पुरुषाची हिंमत होता कामा नये असा कठोर कायदा करा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
आणखी एका आरोपीचा शोध सुरू : या प्रकरणातील जितेंद्र शिंदे उर्फ पप्पू (२५), संतोष भवाळ (३६) आणि नितीन भैलुमे (२६) संशयितांना अटक केली असून सध्या ते पोलिस कोठडीत आहेत. आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.

Web Title: Conflict Resolution in the Criminal Procedure Code

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.