संघटनांमधील वाद धुमसतोय

By admin | Published: February 28, 2017 01:18 AM2017-02-28T01:18:10+5:302017-02-28T01:18:10+5:30

दोन संघटनांमध्ये निर्माण झालेल्या वादाचे पडसात सोमवारीही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उमटलेले दिसून आले.

Conflicts between organizations | संघटनांमधील वाद धुमसतोय

संघटनांमधील वाद धुमसतोय

Next


पुणे : आक्षेपार्ह पोस्टर लावल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)आणि स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया (एसएफआय) या दोन संघटनांमध्ये निर्माण झालेल्या वादाचे पडसात सोमवारीही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उमटलेले दिसून आले. एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे विद्यापीठात रॅली काढण्यास परवानगी मागितली. मात्र, पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठाच्या आवारात अभाविप आणि एसएफआय या दोन संघटनांमध्ये वाद सुरू आहे. दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले; मात्र विद्यापीठाच्या आवारात दडपशाही केली जात असल्याचा आरोप करीत त्याच्या निषेधार्थ एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढण्याची भूमिका घेतली. परंतु, पोलिसांकडून मोर्चास परवानगी न दिल्याने पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये काही काळ वाद झाला. त्यानंतर एकाच ठिकाणी बसून विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून निषेध नोंदवला. सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत विद्यापीठात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
विद्यापीठात जमावबंदी लागू करण्यात आली असल्याचे सांगून पोलिसांकडून रॅली काढण्यास परवानगी दिली जात नाही. मात्र, अभाविपला शनिवारवाड्यापासून कौन्सिल हॉलपर्यंत मोर्चा काढण्यास परवानगी दिली जाते. पोलिसांकडून हा दुजाभाव दाखवला जात असल्याचा आरोपही एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी केला.
एसएफआय संघटनेस संभाजी ब्रिगेड, आयसा, डाप्सा, सम्यक् विद्यार्थी आंदोलन आदी संघटनांनी पाठिंबा दिला. सर्व संघटनांनी भाजपाचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध केला.
>पोलिसांवर राजकीय दबाव
विद्यापीठाच्या मुख्य द्वारापासून ते मुख्य इमारतीपर्यंत रॅली काढण्यासाठी मागच्या आठवड्यात पोलिसांची परवानगी घेतली होती, मात्र सोमवारी सकाळी ११ वाजता अचानक परवानगी नाकारण्यात आली.
राजकीय दबावातून ही परवानगी नाकारली जात असल्याचा आरोप भूषण राऊत या विद्यार्थ्याने केला.विद्यापीठातील अभाविपच्या कार्यकर्त्यांकडून दडपशाही व दादागिरी करून विद्यार्थ्यांवर दबाव आणला जात असल्याचा अरोप विद्यार्थी एसएफआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. पोलिसांनी व विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठात निर्भीड वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी केली.
>सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चर्चा होण्यास हरकत नसली तरी चर्चा या संविधानाच्या कक्षेत राहूनच व्हायला हव्यात. विद्यार्थ्यांच्या चर्चा या वैचारिक पातळीवरच झाल्या पाहिजेत. विद्यापीठातर्फे कुठल्याही प्रकारच्या हिंसक घटनांचे समर्थन केले जाणार नाही. विद्यार्थ्यांनी समजूतदारपणा दाखवणे गरजेचे आहे. कोणत्याही घटनांमुळे विद्यापीठातील वातावरण दूषित होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. तरीही अशा बाबी समोर आल्या तर विद्यापीठ प्रशासनातर्फे संबंधितांवर योग्य कारवाई केली जाईल.
- वासुदेव गाडे,
कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
>विद्यापीठातील विचार स्वातंत्र्य
नष्ट होत चालले असून
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात
‘सावित्री’ची लेक म्हणून बोलायला उभी असताना आज भीती वाटत आहे. आम्हाला दुसऱ्यांकडून देशभक्ती शिकवली जाते. मात्र, आम्ही कोणाला घाबरणार नाही. आम्ही वैचारिक स्वातंत्र्यासाठी उभे राहून लढा
उभारू. शांततेच्या मार्गाने लोकशाहीसाठी
आम्ही झगडत राहू.
- एस. जी. राही, विद्यार्थी

Web Title: Conflicts between organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.