संघर्षयात्रेने प्रश्न सुटत नाहीत

By admin | Published: May 30, 2017 01:18 AM2017-05-30T01:18:13+5:302017-05-30T01:18:41+5:30

देवेंद्र फडणवीस : गारगोटीत राहुल देसार्इंसह काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Conflicts do not solve questions | संघर्षयात्रेने प्रश्न सुटत नाहीत

संघर्षयात्रेने प्रश्न सुटत नाहीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गारगोटी : संघर्षयात्रा काढून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी दुष्काळ आणि निसर्गाशी संघर्ष करावा लागतो. आमचे सरकार एसीमध्ये बसून योजना तयार करीत नाही, तर तेरा जिल्ह्यांतील शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून योजना तयार केल्या आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या संघर्षयात्रेची खिल्ली उडवली.
येथील पोलीस मैदानावर सोमवारी आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश व शेतकरी मेळावा अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्कार्फ घालून भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला.
मुख्यमंत्री म्हणाले, २0१९ पर्यंत महाराष्ट्रातील सर्व बेघरांना घर मिळवून देण्यासाठी हे सरकार प्रयत्नशील आहे. पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातील भारत अस्तित्वात आणायचा आहे. शेतकऱ्यांना बारा तास वीज देण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी फिडरच सौरऊर्जेवर कार्यान्वित करून कमी दरात शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी कटिबद्ध आहोत. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, किसानचे जिल्हाध्यक्ष योगेश परुळेकर, प्रा. एच. आर. पाटील, सरचिटणीस प्रवीणसिंह सावंत, जि. प. सदस्य सुनीता रेडेकर, पं. स. सदस्य आक्काताई नलवडे यांनी मनोगत व्यक्त केले. भाजपचे तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी स्वागत केले. राहुल देसाई यांनी प्रास्ताविक केले. अलकेश कांदळकर यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार अमर साबळे, आमदार अमल महाडिक, पुणे ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, बाबा देसाई, रवी अनासपुरे, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, रमेश रेडेकर, जयवंत डवर, रंगराव पाटील, देवराज बारदेस्कर,संभाजी तहसीलदार, दिनकर देसाई, धोंडीराम मगदूम, प्रकाश कुलकर्णी, किरण कुरडे, शिवाजी मातले, नारायण पाटील, प्रताप मेंगाणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रवेश केलेले प्रमुख कार्यकर्ते
भरत पाटील, प्रभाकर पाटील, रंगराव पाटील, संभाजी तहसीलदार, गोपाळराव कांबळे, एम. डी. पाटील, नामदेव चौगले, जयसिंग खामकर, बी. एस. पाटील, एल. एल. पाटील, रघुनाथ पाटील, संभाजीराजे भोसले, धोंडिराम मगदूम, प्रकाश कुलकर्णी, चंद्रकांत गुरव, प्रताप मेंगाणे, शिवाजी मातले, दगडू राऊळ, सदाशिव देवर्डेकर, जयवंत डवर, पांडुरंग डेळेकर, प्रदीप पाटील, सुभाष पाटील, हिंदुराव देसाई, अशोक जगताप, प्रकाश सावंत, अनिल तळकर, शशिकांत चव्हाण, नारायण पाटील, किरण कुरडे, शिवराज देसाई, सुरेश खोत, एम. एम. कांबळे, किरण नार्वेकर, संदेश भोपळे, प्रताप वारके, पांडुरंग वायदंडे, दिनकरराव भोईटे, शहाजी ढेरे, रवींद्र कामत, बाळ केसरकर, लहू पाटील, सुधीर वर्णे, प्रकाश वास्कर, उत्तम शिउडकर, शांताराम तौदकर, भीमराव निकाडे, एम. डी. देसाई यांच्यासह राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यांतील अनेक नेते व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
गारगोटी शहराला पोलीस छावणीचे स्वरूप
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सुरक्षेसाठी सकाळपासूनच संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चौकाचौकात पोलीस तैनात करण्यात आले होते. सकाळी अकरा वाजता हेलिपॅडपासून क्रांतिज्योतीपर्यंत चाचणी घेण्यात आली होती. यावेळी सायरनचा आवाज ऐकून लोक गोंधळून गेले.
हारतुऱ्यांना फाटा
पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आल्यानंतर हारतुऱ्यांना फाटा देऊन केवळ भारतीय जनता पक्षाचे स्कार्फ देऊन गौरविण्यात आले.
क्रांतिज्योतीला पुष्पहार
स्वातंत्र्याच्या लढ्यात सात वीरांनी हौतात्म्य पत्करले आहे. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ तहसीलदार कार्यालयासमोर क्रांतीज्योत उभारण्यात आली आहे. या ऐतिहासिक शिल्पस्तंभाला पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री फडणवीस कार्यक्रमस्थळाकडे रवाना झाले.
मोजक्यांचेच मनोगत
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वेळेअभावी संयोजकांनी मोजक्या व्यक्तींना मनोगते व्यक्त करण्याची संधी दिली.यामुळे एरव्ही रटाळ भाषणांनी लोकांना होणारा त्रास कमी झाला .
जिल्हा परिषद समकक्ष नेत्यांचा प्रवेश
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत राहुल देसाईंच्या गटातील जिल्हापरिषद समकक्ष नेत्यांचा प्रवेश करून घेतला. यावेळी हजारो कार्यकर्ते पक्ष प्रवेश करण्यासाठी सहभागी झाले होते.

काँग्रेस पोरकी
राहुल देसाई यांच्या माध्यमातून भुदरगड तालुक्यात कॉंग्रेस जिवंत होती. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच अनेक काँग्रेस नेते मंडळी त्यांच्यासोबत पक्षात आली आहेत. त्यामुळे तालुक्यात काँग्रेसची स्थिती दयनीय झाली आहे. आता भक्कम आधार देणारे एकमेव नेतृत्व बाजूला गेल्याने काँग्रेस पोरकी झाली आहे

सुटकेचा श्वास सोडला
निलंगा येथे झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर गारगोटी येथे हेलिपॅडवर हेलिकॉप्टर व्यवस्थित लॅण्ड झाल्यावर तसेच कार्यक्रम संपल्यानंतर व्यवस्थित उड्डाण झाल्याने सर्वच विभागांनी सुटकेचा श्वास सोडला.

२0१९ साठी राहुल देसाई आश्वासक
राहुल देसाई यांच्या भाजप प्रवेशासाठी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. ही गर्दी पाहून चंद्रकांतदादा पाटील यांनी २0१९ मध्ये तालुक्यातील आमदार हा भाजपचाच असेल, असे म्हणताच उपस्थितांनी राहुल देसाईंच्या नावाचा जयजयकार केला. भाजपचा भावी उमेदवार म्हणून उपस्थितांत राहुल देसाईंची चर्चा सुरू होती.

Web Title: Conflicts do not solve questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.