पाच दिवसांच्या आठवड्याला महासंघाचा विरोध
By admin | Published: July 11, 2017 06:06 AM2017-07-11T06:06:32+5:302017-07-11T06:06:32+5:30
पाच दिवसांचा आठवडा करण्यास महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने विरोध दर्शवला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण असला, तरी सलग पाच दिवसांचा आठवडा करण्यास महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने विरोध दर्शवला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत महासंघाचे अध्यक्ष अ.द. कुलकर्णी यांनी ही भूमिका मांडली.
कर्मचाऱ्यांना दोन दिवसांची सुटी देताना सलग ६ दिवस कार्यालय सुरू ठेवण्याची मागणी कुलकर्णी यांनी केली आहे. कुलकर्णी म्हणाले की, रविवारची सुट्टी ठेवत सरकारने सोमवार ते शुक्रवारदरम्यान दुसरी साप्ताहिक रजा द्यावी. जेणेकरून नागरिकांना ६ दिवस कार्यालयीन कामे करता येतील. कौशल्य विकास योजनेंतर्गत सुशिक्षित तरुणांना मानधनावर कामास घेण्याचा प्रस्तावही महासंघाने मुख्यमंत्र्यांना पाठविला आहे. कर्जमाफी दिल्याने शासनाच्या तिजोरीवर ताण आला आहे. अशावेळी सातव्या वेतन आयोगासाठी संपाचा घेतलेला निर्णय चुकीचा होता, असेही महासंघाने स्पष्ट केले.