नंदलाल यांचा नोकरशहांशीच संघर्ष

By Admin | Published: November 27, 2015 03:20 AM2015-11-27T03:20:36+5:302015-11-27T03:20:36+5:30

आपल्या दीर्घ सेवाकाळात एक कर्तव्यकठोर आयएएस अधिकारी, असा लौकिक संपादन केलेले राज्य निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त नंदलाल यांना, आपल्या हक्कांसाठी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संघर्ष करावा

Conflicts with Nandlal's bosses | नंदलाल यांचा नोकरशहांशीच संघर्ष

नंदलाल यांचा नोकरशहांशीच संघर्ष

googlenewsNext

यदु जोशी, मुंबई
आपल्या दीर्घ सेवाकाळात एक कर्तव्यकठोर आयएएस अधिकारी, असा लौकिक संपादन केलेले राज्य निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त नंदलाल यांना, आपल्या हक्कांसाठी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संघर्ष करावा लागत असून, त्यांनी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांचा दरवाजा पुन्हा एकदा ठोठावला आहे.
अतिरिक्त मुख्य सचिव (राजशिष्टाचार व सामान्य प्रशासन विभाग) सुमित मलिक हे आपल्याला हेतुपुरस्सर वाईट वागणूक देत असल्याचा आरोप नंदलाल यांनी केला असून, मलिक यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्याची परवानगी त्यांनी मुख्य सचिवांकडे मागितली आहे. आयएएस म्हणून निवृत्त झाल्यानंतर नंदलाल हे २००९ पर्यंत राज्य निवडणूक आयुक्त होते.
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना, विधिमंडळाचा हक्कभंग केल्याप्रकरणी नंदलाल यांना मार्च २००९ मध्ये दोन दिवस तुरुंगात टाकण्यात आले होते. त्यावेळी ते निवडणूक आयुक्त होते आणि आयुक्तांच्या कार्यालयातूनच त्यांना पोलिसांनी उचलून नेले होते. ते प्रकरण त्यावेळी गाजले होते. याच कारणाने त्यांचे निवृत्तीनंतरचे भत्ते व लाभ अडवून ठेवण्यात आले होते. तथापि, राज्यपालांनी २०१२ मध्ये निर्देश दिल्यानंतर त्यांना सदर रक्कम देण्यात आली होती.
तथापि, राज्य निवडणूक आयुक्त म्हणून काम केल्याचे अतिरिक्त निवृत्तीवेतन आणि विलंबाने मिळालेल्या रकमेवरील व्याज अद्याप न मिळाल्याने नंदलाल कमालीचे नाराज आहेत आणि ते सातत्याने पत्रव्यवहार करीत आहेत.
त्यांनी अलीकडेच एक पत्र मुख्य सचिव क्षत्रिय यांना लिहिले असून, घटनात्मक तरतुदीनुसार हक्काच्या आर्थिक लाभापासून आपल्याला वंचित ठेवले जात असल्याचा आरोप केला आहे. ‘कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी पुरेसा पैसा माझ्याजवळ आहे, पण माझा संघर्ष न्यायासाठी आहे. अन्याय सहन करू नये, ही मला माझ्या वडिलांची शिकवण आहे,’ असे नंदलाल यांचे म्हणणे आहे.
हेतुपुरस्सर वाईट वागल्याची तक्रार
आपल्याला त्यावेळी कनिष्ठ असलेले काही आयएएस अधिकारी हेतुपुरस्सर आपल्याविषयी वाईट का वागत आहेत, याचे कारण आपल्याला ठाऊक नाही. विशेषत: सुमित मलिक यांना आपल्याबद्दल आकस आहे, अशी भावना नंदलाल यांनी क्षत्रिय यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.
नंदलाल यांची थकबाकी अदा करण्यात आली आहे. त्यांनी आता केलेल्या मागणीचा अभ्यास करावा लागेल. नंदलाल यांनी केलेल्या वैयक्तिक आरोपावर कृपया मी उत्तर देऊ शकत नाही.
- सुमित मलिक, अतिरिक्त मुख्य सचिव
मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून केलेल्या सेवेबद्दल अतिरिक्त निवृत्तीवेतन सरकारने दिले नाहीत, तर मी राज्यपालांकडे पुन्हा एकदा धाव घेईन.
- नंदलाल, माजी निवडणूक आयुक्त

Web Title: Conflicts with Nandlal's bosses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.