अभिमतमधील वैद्यकीय प्रवेशाबाबत संभ्रम
By Admin | Published: August 21, 2016 08:50 PM2016-08-21T20:50:05+5:302016-08-21T21:59:08+5:30
एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांचे प्रथम वर्षाचे प्रवेश राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश चाचणी (नीट)द्वारेच होणार
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 21 - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील खासगी विनानुदानित संस्थांमधील एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांचे प्रथम वर्षाचे प्रवेश राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश चाचणी (नीट)द्वारेच होणार असून त्याबाबतचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. मात्र, अभिमत विद्यापीठांना यातून वगळण्यात आल्याचे दिसते. त्यामुळे या विद्यापीठांतील प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
राज्यातील खासगी व अभिमन विद्यापीठांशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश नीटद्वारे होतील, असे यापुर्वीच जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे नीटचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर खासगी व अभिमतमधील प्रवेश एकाच वेळी केले जातील, अशी अपेक्षा विद्यार्थी व पालकांना होती. मात्र, राज्य सामाईक प्रवेश चाचणी केंद्राने शनिवारी काढलेल्या परिपत्रकामध्ये केवळ खासगी संस्थांमधील प्रवेशाचा उल्लेख करण्यात आला आहे. राज्यातील १७ खासगी महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या सुमारे १८०० तर २५ महाविद्यालयांमध्ये बीडीएसच्या सुमारे २३०० जागा आहेत. या संस्थांमधील ८५ टक्के जागा नीटद्वारे राज्यस्तरीय कोट्यातून भरल्या जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाईन माहिती भरण्यास सांगण्यात आले आहे. दि. २४ आॅगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना आॅनलाईन माहिती भरता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ही माहिती भरली आहे, तेच प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. तसेच आलेल्या अर्जातून नीटमधील गुणांच्याआधारे राज्य गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाणार आहे.
केंद्राने प्रसिध्द केलेल्या परिपत्रकामध्ये अभिमत विद्यापीठांशी संलग्न महाविद्यायांमधील प्रवेशाचा उल्लेखही करण्यात आलेला नाही. ह्यअभिमत महाविद्यालये वगळूनह्ण असे त्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात आठ अभिमत विद्यापीठे असून त्यांच्याशी संलग्न ९ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या सुमारे १५०० जागा आहेत. या जागांवर प्रवेशासाठीही दरवर्षी मोठी चढाओढ असते. अनेक विद्यार्थी-पालक खासगी संस्थांबरोबरच अभिमत विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी अधिक प्राधान्य देतात. मात्र, सध्या राज्य शासनाकडून त्यांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत कोणत्याही सुचना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यापीठांसह विद्यार्थी व पालकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.
प्रवेशाबाबत शासनाकडून कोणतीही सुचना न आलेल्या काही विद्यापीठांनी त्यांच्या पातळीवर प्रवेश प्रक्रिया सुरूही केली आहे. विद्यापीठ स्तरावरच प्रवेश राहिल्यास नीट गुणांच्या आधारे ही प्रक्रिया राबविली जाणार असली तरी इच्छुक विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यापीठासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागु शकतो. त्यामध्ये त्यांना आर्थिक भुर्दंडही बसण्याची शक्यता आहे.
-------------------
अभिमत विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांतील प्रवेशाबाबतच्या निर्णयाची फाईल वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे पाठविण्यात आली आहे. सोमवारी याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.
- डॉ. प्रविण शिनगारे
संचालक, वैद्यकीय शिक्षण संचालनालय