मेडिकल प्रवेशावरून गोंधळात गोंधळ
By admin | Published: August 23, 2016 05:40 AM2016-08-23T05:40:51+5:302016-08-23T05:40:51+5:30
एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांचे प्रथम वर्षाचे प्रवेश ‘नीट’च्या गुणवत्ता यादीनुसार होणार असल्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे.
पुणे : अभिमत विद्यापीठांशी सलंग्न वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांचे प्रथम वर्षाचे प्रवेश ‘नीट’च्या गुणवत्ता यादीनुसार होणार असल्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे. मात्र, सध्या विद्यार्थ्यांना खासगी आणि अभिमतसाठी स्वतंत्रपणे अर्ज भरावा लागत असल्याने दोन्हीसाठी गुणवत्ता यादी एकच असेल की स्वतंत्र, यावरून विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळ आहे.
खासगी संस्थांत प्रवेशाबाबतचे परिपत्रक वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर शनिवारी टाकण्यात आले होते. या प्रक्रियेत अभिमत विद्यापीठांना वगळण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तर सोमवारी अभिमत विद्यापीठांसाठी स्वतंत्र परिपत्रक काढण्यात आले. त्यामध्ये अभिमत विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी व गुणवत्ता यादीसाठी माहिती भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना खासगी व अभिमतसाठी अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र लिंक देण्यात आलेल्या आहेत.
सामाईक प्रवेश कक्षाने काढलेल्या परिपत्रकानुसार सध्या तरी विद्यार्थ्यांना खासगी व अभिमतसाठी स्वतंत्र माहिती भरावी लागणार असल्याचे चित्र आहे. त्यासाठी २४ आॅगस्ट ही मुदत आहे. तर २७ आॅगस्ट रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ही गुणवत्ता यादी खासगी व अभिमतसाठी स्वतंत्र असेल की दोन्हीसाठी एकत्रितपणे यादी प्रसिद्ध केली जाईल, याबाबत प्रवेश कक्ष किंवा वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने अधिकृतपणे काहीही स्पष्ट केलेले नाही. अभिमत प्रवेशाचे वेळापत्रकही अर्धवट असून पसंतीक्रम, अर्ज भरणे व पुढील प्रवेश प्रक्रियेबाबत त्यात माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे गुणवत्ता यादीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
याविषयी सायन्स अॅकॅडमीचे दिलीप शहा म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये अजूनही मोठा संभ्रम आहे. खासगी व अभिमत विद्यापीठासाठी स्वतंत्र अर्ज करायचा की नाही, याबाबत संभ्रम आहे. (प्रतिनिधी)