चुकीच्या सूचनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ
By Admin | Published: February 27, 2017 12:10 AM2017-02-27T00:10:19+5:302017-02-27T00:10:19+5:30
विद्यार्थ्यांना चुकीच्या सूचना दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला
पिंपरी : शिष्यवृत्ती परीक्षेवेळी केंद्र संचालक व पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांना चुकीच्या सूचना दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ
निर्माण झाला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. रविवारी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेचे केंद्र निगडी, प्राधिकरणातील एका शाळेत होते. या केंद्रावर केंद्र संचालक व पर्यवेक्षकांनी परीक्षा कालावधीच्या वेळेबाबत विद्यार्थ्यांना चुकीच्या सूचना दिल्याने विद्यार्थी गोंधळले. पेपरची वेळ संपण्यास पंधरा ते वीस मिनिटांचा वेळ शिल्लक असतानाही तेथील पर्यवेक्षकांनी केवळ दोनच मिनिटे शिल्लक असल्याची सूचना विद्यार्थ्यांना केली. यामुळे विद्यार्थ्यांनी उरलेले प्रश्न घाईघाईत सोडविले. वेळ असतानाही विद्यार्थ्यांना प्रश्न सोडविण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. या घाईगडबडीत विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
तसेच काही सेमी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तरी या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून चौकशी व्हावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.(प्रतिनिधी)