"स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजननक्षमता कमी होते"; MPSC च्या परीक्षेतील प्रश्नाने विद्यार्थी गोंधळात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 03:31 PM2024-12-04T15:31:41+5:302024-12-04T15:32:57+5:30
एमपीएससी परीक्षेत स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेवरुन विचारलेल्या प्रश्नावरुन विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
MPSC Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नावरुन सध्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झालं आहे. आयोगामार्फत रविवारी विविध केंद्रावर महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२४ घेण्यात आली. मात्र या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांवरुन अतार्किक प्रश्नांवरुन विद्यार्थ्यांकडून सवाल उपस्थित केले जात आहेत. आयोग आधीच्या प्रमाणे विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचे पायंडे मोडताना दिसत असल्याचे विद्यार्थ्यांकडून म्हटलं जात आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रविवारी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात आली. राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. वर्षभराने ही परीक्षा पार पडल्याने सर्वांचेच याकडे लक्ष लागलं होतं. मात्र यावेळी या परीक्षेच्या पेपरमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न चर्चेचा विषय ठरले आहेत. या पेपरमधील दोन प्रश्न हे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यातील पहिला प्रश्न हा स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेचा होता तर दुसरा प्रश्न हा मद्यपानासंदर्भात होता.
या पेपरमध्ये स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजननक्षमता कमी होते असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यासोबत शिक्षणामुळे स्त्रियांच्या कामाच्या संधी सुधारतात, शिक्षीत स्त्रियांना स्वतःच्या मुलांनी शिक्षीत व्हावे वाटते, शिक्षण आणि साक्षरता स्त्रियांना गर्भनिरोधकविषयी अधिक ग्रहणक्षम बनवते, स्त्रियांची आर्थिक स्थिती सुधारते, हे चार पर्याय देण्यात आले होते. सोशल मीडियावर हा प्रश्न आता तुफान व्हायरल होत असून एकीकडे महिला सबलीकरणाचा मुद्दा उचलून धरण्याचा प्रयत्न केला जातो तर दुसरीकडे महिलांचे खच्चीकरण केलं जातंय, असं म्हटलं जात आहे.
इतर लाखो प्रश्न उभे असताना अशा प्रश्नांची खरच गरज आहे का? यामुळे एमपीएससीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे होत आहेत, असं विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. स्त्री शिक्षण आणि प्रजनन क्षमता या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाची रचना चुकीची असल्याचेही म्हटलं जात आहे. तसेच प्रश्न निवडताना तज्ज्ञ लोकांची निवड केली पाहिजे असाही सल्ला देण्यात आला आहे.
मद्यपानासंदर्भातही विचारले प्रश्न
याआधी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला मद्यपानाचा प्रश्नही व्हायरल होत होता. तुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते आणि तुम्हाला ते मद्यपान करण्यास प्रभावित करत आहेत. जर तुम्हाला त्यांच्या सोबत जायचे नसेल आणि त्यांच्या अल्कोहोल सेवन करण्याच्या सवयीपासून स्वतःला बाहेर ठेवायचे असेल तर तुम्ही काय कराल? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
या प्रश्नासाठी मी माझ्या मित्रांना सांगेन की माझ्या पालकांनी मला दारू पिण्यास मनाई केली आहे, दारू पिण्यास नकार देईन, फक्त तुमचे मित्र मद्यपान करतात म्हणून मद्यपान करेन, नकार देईन आणि त्यांना खोटे सांगेन की तुम्हाला यकृताचा आजार आहे, असे पर्याय देण्यात आले होते.
त्यामुळे हे प्रश्न तर अजब आहेत आणि उत्तरांचे पर्यायही आश्चर्यकारक होते आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांसह पालकही गोंधळात सापडले आहेत. एमपीएससीने यावर काही तरी तोडगा काढायला हवा अशी मागणी देखील केली जात आहे.