गोंधळातच वाया जात आहे विधिमंडळाचा वेळ : राजेंद्र दर्डा
By admin | Published: December 20, 2015 02:10 AM2015-12-20T02:10:00+5:302015-12-20T02:10:00+5:30
सध्या संसद व विधिमंडळात अभ्यासपूर्ण भाषणांची उणीव जाणवते आहे. विकासावर चर्चा होण्याऐवजी गोंधळातच वेळ वाया जात आहे. जनहिताच्या विधेयकांना चर्चेशिवाय मंजुरी देण्यात येत आहे.
नागपूर : सध्या संसद व विधिमंडळात अभ्यासपूर्ण भाषणांची उणीव जाणवते आहे. विकासावर चर्चा होण्याऐवजी गोंधळातच वेळ वाया जात आहे. जनहिताच्या विधेयकांना चर्चेशिवाय मंजुरी देण्यात येत आहे. योजनांच्या अंमलबजावणीबाबत आग्रही भूमिका घेतली जात नाही. सरकार व विरोधी पक्ष ही लोकशाहीची दोन चाकं आहेत. त्यामुळे सरकारने विरोधकांना विश्वासात घेतलेच पाहिजे आणि विरोधी पक्षांनीही जनहिताच्या विधेयकांसाठी सहकार्य करायला हवे, असे मत लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केले.
पां.वा. गाडगीळ, बाबा दळवी स्मृती पत्रकारिता प्रदान समारंभातील अध्यक्षीय भाषणात राजेंद्र दर्डा यांनी लोकशाही समृद्ध करण्यावर भर दिला. ते म्हणाले, संस्थापक संपादक ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा यांची लोकमत दैनिक सुरू करण्यामागची भावना शोषित वंचितांना न्याय देण्याची आणि लोकशाहीला अधिक मजबूत करण्याची होती. लोकमतचे पहिले संपादक पत्रपंडित पद्मश्री पां.वा. गाडगीळ यांनी आर्थिक आणि सामाजिक विषयावर विपुल लेखन केले.
साम्यवाद आणि समाजवादाचे मध्यसूत्र सर्वसामान्य माणसाला सोप्या भाषेत त्यांनी समजावून सांगितले. त्यामुळे लोकमतने गाडगीळ यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ १९८८ मध्ये सामाजिक-आर्थिक विकास लेखन पुरस्कार सुरू केला. त्यांच्यानंतर लोकमतची धुरा सांभाळलेले म.य. उपाख्य बाबा दळवी यांच्या लेखनीला सामाजिक भान होते. त्यांना परिवर्तनाचा ध्यास होता. त्यांनी महाराष्ट्रातील वृत्तपत्र सृष्टीला समतेचा डोळा दिला. त्यांनी शोषितांना लढण्याचे बळ आणि मुक्यांना शब्द दिले. त्यामुळे १९९६ साली बाबांच्या नावाने लोकमतने राज्यस्तरीय शोधपत्रकारिता पुरस्कार सुरु केला. वाचक हाच केंद्रबिंदू मानून एक परिपूर्ण वृत्तपत्र म्हणून लोकमतची वाटचाल यापुढेही सुरू राहील, असे राजेंद्र दर्डा यांनी शेवटी सांगितले.