फरार शिक्षकाच्या सुटी अर्जावरून दोघांचा पळशी येथील शाळेत गोंधळ! मुख्याध्यापकाला धमकी: महिलेसह दोघांविरोधात गुन्हा
By अनिल गवई | Published: September 3, 2022 03:48 PM2022-09-03T15:48:11+5:302022-09-03T15:48:11+5:30
प्रेमकविता लिहून शिक्षिकेच्या नावाने व्हायरल प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या शिक्षकांच्या पत्नी आणि भावाने शुक्रवारी दुपारी पळशी बु. येथील जिल्हा परिषद शाळेत एकच गोंधळ घातला.
खामगाव:
प्रेमकविता लिहून शिक्षिकेच्या नावाने व्हायरल प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या शिक्षकांच्या पत्नी आणि भावाने शुक्रवारी दुपारी पळशी बु. येथील जिल्हा परिषद शाळेत एकच गोंधळ घातला. फरार शिक्षकाची सुटी तात्काळ मंजूर करण्यासाठी दबाव आणत सुटी अर्जाच्या सत्यप्रतीवर स्वाक्षरी आणि शिक्का देण्यासाठी धमकी दिली. याप्रकरणी मुख्याध्यापकाच्या तक्रारीवरून संबंधित शिक्षकाच्या पत्नीसह भावाविरोधात ग्रामीण पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
शाळेतील सहकारी शिक्षिकेच्या नावे प्रेमकविता लिहून शैक्षणिक ग्रुपवर व्हायरल केली. तसेच शिक्षिकेशी जवळीत साधण्याच्या उद्देशाने तिच्याकडे टकटक पाहत शिक्षिकेचा विनयभंग केला. याप्रकरणी संबंधित शिक्षिकेच्या तक्रारीवरून रोहिदास रामदास राठोड (५२) या शिक्षकाविरोधात ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, या शिक्षकाची सुटी तात्काळ मंजूर करा तसेच सुटी अर्जाच्या सत्यप्रतीवर स्वाक्षरी आणि शिक्यासाठी दबाव आणला. तसेच मुख्याध्यापकाच्या टेबलावरील शिक्का घेऊन स्वत:च्या हाताने सत्यप्रतीवर मारला. त्यानंतर शिक्का फेकून देत मुख्याध्यापकांना धमकी दिली. अशी तक्रार पळशी बु. येथील मुख्याध्यापक कैलास प्रभु राठोड (५४ रा. पळशी बु.) यांच्या तक्रारीवरून दिपाली रोहिदास राठोड रा. खामगाव, शिवदास रामदास राठोड रा. बुलढाणा यांच्या विरोधात खामगाव ग्रामीण पोलिसांनी भादंवि कलम १८६, १८९ तसेच क्रिमीनल लॉ अमेंटमेंट अॅक्ट १९३२ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल केला.