उल्हासनगर महापालिका महासभेत धोकादायक इमारतीवरून हंगामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 09:25 PM2021-06-18T21:25:03+5:302021-06-18T21:28:28+5:30
स्ट्रॅक्टरल ऑडिट विना इमारतीला नोटिसा दिल्या कशा? असा प्रश्न भाजपचे नगरसेवक राजेश वधारीया यांनी करून महापालिकेच्या कारभारावर बोट ठेवले.
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिकेच्या ऑनलाईन महासभेत धोकादायक इमारती व त्यांना देण्यात येत असलेल्या नोटिसा बाबत भाजपा नगरसेवकांनी आयुक्तांसह अधिकाऱ्यांना धारेवर धरले. स्ट्रॅक्टरल ऑडिट विना इमारतीला नोटिसा दिल्या कश्या? असा प्रश्न भाजपचे नगरसेवक राजेश वधारीया यांनी करून महापालिकेच्या कारभारावर बोट ठेवले.
उल्हासनगरात गेल्या महिन्यात मोहिनी पॅलेस व साईशक्ती इमारतीचा स्लॅब कोसळून १२ जणांचा बळी गेला. तर अनेकजण जखमी झाले. यापूर्वीही इमारतीचे स्लॅब कोसळून अनेकांचे बळी गेले आहेत. अश्या घटना टाळण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी १० वर्ष जुन्या तब्बल १३०० इमारतीला स्ट्रॅक्टरल ऑडिट करण्यासाठी नोटिसा दिल्या. तसेच सन १९९२ ते ९८ दरम्यानच्या इमारतीचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रभाग निहाय समित्या नेमून ५०५ इमारतीची यादी जाहीर करून स्ट्रॅक्टरल ऑडिट मागितले. तर काही अतीधोकादायक इमारतीचा वीज व पाणी पुरवठा खंडित केला. महापालिकेच्या या कारवाईने सर्वसामान्य नागरिकांत संभ्रम निर्माण झाला असून नगरसेवकानी याकारवाई बाबत नाराजी व्यक्त केली. भाजपचे नगरसेवक राजेश वधारिया यांनी महापौर लिलाबाई अशान व आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांना स्ट्रॅक्टरल ऑडिट विना इमारतीला कोणत्या आधारे नोटिसा दिल्या. असा प्रश्न करून महापालिकेच्या कारभारावर टीका केली.
गेल्या चार महिन्यानंतर महापालिकेची महासभा ऑनलाईन सुरू झाल्यावर शहराच्या माजी आमदार व महापौर ज्योती कलानी यांच्यासह दिवंगत माजी नगरसेवकांना श्रद्धांजली वाहण्यात येऊन, महापौर लिलाबाई अशान व उपमहापौर भगवान भालेराव यांनी महासभा सुरू केली. यावेळी शहरातील धोकादायक इमारती व त्यांना देण्यात आलेल्या नोटिसा बाबत बहुतांश नगरसेवकांनी आयुक्तांना जाब विचारला. एकाच वेळी अनेक नगरसेवक बोलत असल्याने, नेमके कोण काय बोलते. हे ऐकू येत नसल्याने, महासभेत गोंधळ उडाल्याचे चित्र होते. शहर विकास कामे, नाले सफाई, महापालिका उत्पन्न, कोरोना बाबत उपाययोजना आदी बाबत चर्चा झाली. भाजपचे नगरसेवक महापालिका महासभेच्या गेटवर एकत्र येऊन इमारतींना दिलेल्या नोटीसीचा निषेध करून घोषणाबाजी केली. एकूणच ऑनलाईन महासभा गोंधळात संपन्न झाली.
भाजप नगरसेवक आक्रमक
शहरातील विकास कामे, इमारतींना नोटिसा देऊन पाणी व वीज पुरवठा खंडित करणे, कोरोना काळात सावळागोंधळ आदी प्रकरणी भाजप नगरसेवक आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, राजेश वधारिया, राजू जग्यासी यांच्यासह अन्य भाजप नगरसेवक महासभेच्या प्रवेशद्वारावर एकत्र येऊन घोषणाबाजी केली. शहरात भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार असल्याचे चित्र होते.