शिक्षणात संभ्रमावस्था

By Admin | Published: April 9, 2017 12:12 AM2017-04-09T00:12:28+5:302017-04-09T00:12:28+5:30

एनआयआरएफतर्फे देशातील महाविद्यालयांना रँकिंग देण्यात येते. म्हणजे देशात कोणते महाविद्यालय, विद्यापीठ अथवा संस्था अव्वल आहे, हे ठरवण्यात येते.

Confusion in education | शिक्षणात संभ्रमावस्था

शिक्षणात संभ्रमावस्था

googlenewsNext

- राजन वेळूकर

एनआयआरएफतर्फे देशातील महाविद्यालयांना रँकिंग देण्यात येते. म्हणजे देशात कोणते महाविद्यालय, विद्यापीठ अथवा संस्था अव्वल आहे, हे ठरवण्यात येते. देशातील १०० महाविद्यालयांची यादी जाहीर करण्यात येते. एनआयआरएफतर्फे यंदा जाहीर करण्यात आलेल्या रँकिंगवर अनेक चर्चा रंगल्या. कारण या रँकिंगमध्ये अनेक महाविद्यालये पुढे गेली, तर काही नामांकित महाविद्यालये ही मागे पडली आहेत. त्यामुळे आता नॅक की एनआयआरएफ यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

देशात एकूण ७०० विद्यापीठे आहेत, पण त्यापैकी फक्त १०० क्रमांक एनआयआरएफतर्फे देण्यात आले. १००व्या क्रमांकावर असलेल्यांचे गुण इतके कमी आढळून आले आहेत की, त्यामुळे अन्य विद्यापीठांचे काय, हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.

देशातील शिक्षण संस्था आणि महाविद्यालयांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि शिक्षणात समानता यावी, यासाठी सरकारतर्फे १९८४ साली नॅशनल एसेसमेंट अँड अ‍ॅक्रिडिएशन कौन्सिलची (नॅक) स्थापना करण्यात आली . नॅकतर्फे महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता तपासून त्यांना ग्रेड (ए, बी, सी) देण्यात येतात. एखाद्या महाविद्यालयाला भेट देऊन, तिथल्या गोष्टींची, कागदपत्रांची तपासणी करून ग्रेड देण्यात येते. गेल्या दोन वर्षांपासून मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅकिंग फ्रेमवर्क’ (एनआयआरएफ)ची सुरुवात करण्यात आली.
त्याप्रमाणे, ‘नॅक’तर्फे ग्रेड दिली जाते. ग्रेडमुळे एका श्रेणीत अनेक महाविद्यालयांचा समावेश असतो, पण क्रमांक दिल्यास एकाच महाविद्यालयाला एक स्थान मिळते, त्यामुळे त्याचा क्रम लावला जातो. एनआयआरएफतर्फे हे काम केले जाते. नॅकच्या ग्रेडिंगसाठी महाविद्यालयाला प्रत्यक्ष भेट दिली जाते, पण एनआयआरएफमध्ये महाविद्यालयांना स्वत:हून त्यांचे काम सबमिट करावे लागते. नॅकतर्फे ग्रेड देताना ७ निकषांचा विचार केला जातो. कॅरिक्युलर आस्पेक्ट, टीचिंग-लर्निंग अँड इव्हॅल्युएशन, रिसर्च-कन्सल्टंसी अँड एक्स्टेंशन, इन्फ्रास्ट्रक्चर अँड लर्निंग रिसोर्सेस, स्टुडंट सपोर्ट अँड प्रोगे्रशन, गव्हर्न्सन-लीडरशीप अँड मॅनेजमेंट, इनोव्हेशन अँड बेस्ट प्रॅक्टिस या सर्व बाबींचा लेखाजोखा मांडून ग्रेड दिली जाते.
एनआयआरएफतर्फे टीचिंग लर्निंग अँड रिसोर्सेस (टीएलआर), रिसर्च अँड प्रोफेशनल प्रॅक्टिस (आरपीसी), ग्रॅज्युएशन आउटकम (जीओ), आउटरिच अँड इन्क्लुझिव्हिटी (ओआय) आणि परसेप्शन (पीआर) या बाबींवर मूल्यांकन केले जाते. हे निकष महाविद्यालय, विद्यापीठ स्वत: अर्जाद्वारे एनआयआरएफकडे पाठवतात. या अर्जांमध्ये दिलेल्या माहितीवर गुण देऊन क्रमांक देण्याचे काम करण्यात येते, पण यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येत असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
एनआयआरएफतर्फे यंदा जाहीर करण्यात आलेल्या अहवालात याच पाच निकषांवर देशातील १०० महाविद्यालायांची निवड करण्यात आली, पण या क्रमवारीत पहिल्या आणि शंभराव्या महाविद्यालयांच्या गुणांमध्ये असलेली तफावत खूप मोठी आहे. टीएलआरमध्ये पहिल्या क्रमांकाला ८३.११ गुण आहेत, तर शंभराव्या क्रमांकाला २२.६१ इतके आहेत. आरपीसीमध्ये पहिल्याला ८७.५९ तर शेवटच्या क्रमांकाला १.०४ आहेत. जीओला ९८.७१ तर शेवटच्या क्रमांकाला ३५.०८ आहेत. ओआयमध्ये ८६.४९ तर ३५.४४ मिळाले आहेत. पीआरला ८३.३३ आणि ०.०२ इतके कमी आहे. या सर्व आकडेवारीतील तफावत ही खूप मोठी आहे. पहिल्या क्रमांकात आणि शेवटच्या क्रमांकात असलेली तफावत पाहता, गुण कमी असल्याने याकडे विशेष गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. दोन क्रमांकात असलेली तफावत इतकी मोठी मानली, तर नक्की दोष कोणात आहे अथवा वास्तवात शिक्षण क्षेत्रात इतक्या मोठ्या प्रमाणात तफावत आहे का, याची उत्तरे शोधणे गरजेचे ठरते. विद्यापीठ, संस्थांच्या शिक्षण देण्यात इतकी तफावत असल्यास, शास्त्रशुद्धपणे मोठ्या प्रमाणावर कारणमीमांसा होणे गरजेचे आहे.
एनआयआरएफ आणि नॅकमध्येही यामुळे तफावत दिसून येत आहेत. नॅकप्रमाणे ए अथवा ए प्लसमध्ये असणारी काही महाविद्यालये ही एनआयआरएफ क्रमवारीत अव्वल आहेत. याउलट जी नॅक ग्रेडिंगमध्ये कमी असलेली एनआयआरएफमध्ये काही ठिकाणी अव्वल ठरली आहेत. त्यामुळे आता एक संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. शिक्षण क्षेत्रात नक्की कोणते निकष खरे, त्याचा दर्जा किती, याविषयी चित्र स्पष्ट होत नाही.


(लेखक मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.)
शब्दांकन- पूजा दामले

Web Title: Confusion in education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.