होली क्रॉस शाळेत प्रवेशावरून गोंधळ
By admin | Published: June 5, 2014 09:53 PM2014-06-05T21:53:44+5:302014-06-05T23:03:14+5:30
प्रवेश यादीतून २५ नावे वगळून नवीन यादी प्रसिध्द केल्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी दुसर्या दिवशीही शाळेसमोर निदर्शने केली.
ठाणे - राबोडीतील होली क्रॉस या खाजगी शाळेच्या प्रशासनाने आधी जाहीर केलेल्या ज्युनिअर के.जी. प्रवेश यादीतून २५ नावे वगळून नवीन यादी प्रसिध्द केल्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी दुसर्या दिवशीही शाळेसमोर निदर्शने केली. अखेर या प्रकरणाची ठाणे महापालिका शिक्षण विभागाने दखल घेतली असून या संदर्भात शुक्रवारी शाळा व्यवस्थानाबरोबर बैठक घेण्याचे निश्चित केले आहे. तसेच शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्याचे आदेशही शिक्षणाधिकारी गणपत मोरे यांनी दिले आहेत.
राबोडी येथील ही शाळा केवळ मुलींसाठी असून या शाळेने ज्युनिअर के. जी. प्रवेश प्रक्रिया सुरु केली होती. पालकांनी प्रवेशाचे अर्ज भरुन सादर केल्यानंतर शाळा प्रशासनाने २९ मार्च रोजी पात्र विद्यार्थ्यांच्या नावाची यादी जाहीर जाहीर केली होती. मात्र त्यानंतर शाळा प्रशासनाने नोटीस लावून ही यादी रद्द केल्याचे जाहीर केले होते. तसेच ३ जून रोजी पालक नवीन यादी जाहीर होईल, असे स्पष्ट केले होते. त्यावेळी आधीच्या यादीतील २५ जणांची नावे नवीन यादीत नसल्याचे पालकांच्या निदर्शनास आले. या संदर्भात पालकांनी शाळा प्रशासनास जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पालकांनी या संदर्भात महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर या तक्रारीची दखल घेत शिक्षणाधिकारी मोरे यांनी गुरुवारी शाळेला भेट दिली. मात्र त्यांना तेथे कोणीही भेटले नाही. त्यामुळे त्यांनी शुक्रवारी शाळा प्रशासनासोबत बैठक बोलावली आहे. तर या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ही बैठक बोलावल्याची माहिती त्यांनी दिली. यामध्ये नवीन यादी निवडीचे निकष काय आहेत, याविषयी शाळा व्यवस्थापनाकडे खुलासा घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिल्याचेही त्यांनी सांगितले.