‘नीट’ परीक्षेमध्ये गोंधळ!
By admin | Published: May 2, 2016 01:01 AM2016-05-02T01:01:27+5:302016-05-02T01:01:27+5:30
वैद्यकीय प्रवेशाच्या राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा अर्थात ‘नीट’मधील गोंधळात रविवारी आणखी भर पडली आहे. नवी मुंबईतील ऐरोलीमधील डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये परीक्षेसाठी गेलेल्या
मुंबई : वैद्यकीय प्रवेशाच्या राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा अर्थात ‘नीट’मधील गोंधळात रविवारी आणखी भर पडली आहे. नवी मुंबईतील ऐरोलीमधील डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये परीक्षेसाठी गेलेल्या १२ विद्यार्थ्यांना उशिरा पोहोचल्याच्या कारणास्तव परीक्षेला मुकावे लागले. मात्र शाळा
प्रशासनाने परीक्षा सुरू होण्याच्या
तीन मिनिटांआधीच गेट बंद
केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
ऐरोलीतील डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये १२ विद्यार्थी परीक्षेला मुकल्याचे समोर आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे परीक्षेला मुकलेल्या या मुलांना पुढील दुसऱ्या सत्रात होणाऱ्या २४ जुलैची संधीही मिळणे अशक्य होणार आहे. सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या या परीक्षेला विद्यार्थ्यांनी ९.३० वाजण्याआधी परीक्षा केंद्रात उपस्थित राहण्याची सूचना मंडळाने आधीच केलेली आहे. मात्र परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपानुसारशाळा प्रशासनाने सकाळी ९ वाजून २८ मिनिटांनाच प्रवेशद्वार बंद केले. वेळेआधीच गेट बंद केल्याचे शाळा प्रशासनाला लक्षात आणून दिल्यानंतरही प्रशासनाच्या घडाळ््याप्रमाणेच गेट बंद केल्याचे स्पष्टीकरण शाळा प्रशासनाने दिल्याचा आरोप संबंधित विद्यार्थ्यांनी केला आहे.
एका मिनिटामुळे वर्ष वाया!
अहमदनगरहून परीक्षेसाठी आलेल्या स्वप्नाली जाधव या विद्यार्थिनीला केवळ एका मिनिटाच्या विलंबामुळे परीक्षेला मुकावे लागले. सकाळी ८ वाजताच परीक्षा केंद्रावर येऊन थांबलेल्या स्वप्नालीने परीक्षा ओळखपत्रावर फोटो लावलेला नव्हता. तोच मिळवण्यासाठी ती सकाळी परिसरात फोटो स्टुडिओ शोधत होती. मात्र फोटो मिळवून परीक्षा केंद्रावर पोहोचायला तिला केवळ एका मिनिटाचा उशीर झाला. या प्रकाराबाबत शाळा प्रशासनाला माहिती देऊन विनंती केल्यानंतरही परीक्षेला बसता आले नसल्याचे स्वप्नालीने सांगितले. (प्रतिनिधी)
परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी विविध उपाय
परीक्षा सुरळीत पार पडावी म्हणून मंडळाने विविध उपाययोजना केल्या. त्यात परीक्षा केंद्रांवर मोबाइल जॅमर लावणे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मेटल डिटेक्टरची मदत घेण्यात आली. दरम्यान, कॉपीमुक्त परीक्षेसाठी काही केंद्रांवर सीसीटीव्हीची उपाययोजनाही करण्यात आली होती.
आजच्या निर्णयाकडे विद्यार्थ्यांचे डोळे
राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष सोमवारी राज्य सरकारकडून सादर होणाऱ्या फेरविचार याचिकेकडे लागले आहे. याआधी अनेकांची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे नीटच्या निकालाआधी फेरविचार याचिकेच्या निर्णयाचे टेन्शन विद्यार्थ्यांना आहे.