गुजरातला पाणी देण्यावरून गोंधळ
By Admin | Published: April 10, 2015 04:12 AM2015-04-10T04:12:30+5:302015-04-10T04:12:30+5:30
नार-पार-तापीचे पाणी गुजरातला देण्यावरून विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला. माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ
मुंबई : नार-पार-तापीचे पाणी गुजरातला देण्यावरून विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला. माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी हातात फलक घेऊन वेलमध्ये ठिय्या मांडल्याने एकच गोंधळ उडाला.
प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच भुजबळ हातात फलक घेऊन वेलमध्ये उतरले. त्यांच्या या मौन सत्याग्रहात पंकज भुजबळ, दीपिका चव्हाण, जीवा पांडू गावित हेदेखील सहभागी झाले.
प्रश्न मांडण्यासाठी संसदीय आयुधं अपुरी आहेत का, असा सवाल करीत भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ सदस्यांनी असे करणे योग्य नाही, असे मत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले; तेव्हा भुजबळांवर अशी वेळ का आली? असा प्रतिवाद दिलीप वळसे पाटील यांनी केला. त्यावर सभागृहात बॅनर घेऊन येणे प्रथा, परंपरेच्या विरोधात आहे असे आम्हाला माजी अध्यक्ष वळसे पाटील सांगत असत, असा टोला अनिल गोटे यांनी लगावला.
नार-पार-तापीचे पाणी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या हक्काचे आहे. मात्र हे पाणी गुजरातला देण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. या विषयाचे सादरीकरण विधान परिषदेच्या सदस्यांना केले गेले; मात्र अधिवेशन सुरू झाल्यापासून मागणी करूनही ते विधानसभेच्या सदस्यांना दाखवले जात नाही. म्हणून भुजबळांना हा मार्ग अवलंबावा लागल्याचे वळसे म्हणाले. शेवटी त्यांनीच वेलमध्ये बसलेल्या भुजबळांसह सगळ्या सदस्यांना आसनावर बसण्याची विनंती केली.
भुजबळ म्हणाले, सभागृहात बॅनर आणण्याचे काम याआधी मी एकदाच केले होते. मात्र त्यानंतर आजपर्यंत आपण कधीही वेलमध्ये उतरलो नव्हतो. महाराष्ट्राचे १३३ टीएमसी पाण्यातले २० टीएमसी पाणी मुंबईला देऊन बाकीचे सगळे
गुजरातला देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे. आपण आपल्या पाण्यावरचा हक्क सोडला तर भविष्यात आपली
अवस्था अत्यंत बिकट होईल. आणखी ५-१० वर्षांनी आपल्या हाती
काहीच शिल्लक राहणार नाही, असेही भुजबळ या वेळी म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)