आरोग्य विभागाच्या परीक्षेत राज्यभरात गोंधळात गाेंधळ; परीक्षा केंद्र शोधताना उमेदवारांचे हाल, अनेकांची दुसऱ्या सत्राची परीक्षा हुकली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 06:34 AM2021-10-25T06:34:41+5:302021-10-25T06:35:15+5:30
health department exams : आधी दोन वेळा परीक्षा रद्द करूनही तिसऱ्या वेळी परीक्षांच्या नियोजनात राज्यभरात मोठा गोंधळ झाल्याचे दिसून आले. अनेक उमेदवारांना एका सत्राची परीक्षा देता आली, तर दुसऱ्या सत्राची परीक्षा देता आली नाही.
पुणे/औरंगाबाद/नाशिक : परीक्षा केंद्रावर बैठक व्यवस्था नसणे, पेपर उशिरा सुरू होणे, चुकीची प्रश्नपत्रिका देणे अशा अनेक समस्यांचा सामना रविवारी झालेल्या सार्वजनिक आराेग्य विभागाच्या गट-कमधील सर्व रिक्त पदे भरण्यासाठी झालेल्या परीक्षेदरम्यान उमेदवारांना करावा लागला. आधी दोन वेळा परीक्षा रद्द करूनही तिसऱ्या वेळी परीक्षांच्या नियोजनात राज्यभरात मोठा गोंधळ झाल्याचे दिसून आले. अनेक उमेदवारांना एका सत्राची परीक्षा देता आली, तर दुसऱ्या सत्राची परीक्षा देता आली नाही.
पुण्यातील आबेदा इनामदार कॉलेजमधील परीक्षा केंद्रावर उमेदवारांचे पेपर नियोजित वेळेत सुरू झाले नाहीत. प्रश्नपत्रिकासुद्धा व्यवस्थित सील केलेल्या नव्हत्या, असा आरोप उमेदवारांकडून केला जात आहे. काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या कंपनीला परीक्षा घेण्याचे काम का देण्यात आले, याची चौकशी करण्याची मागणी परीक्षार्थींनी केली. तीन वर्गांमध्ये प्रश्नपत्रिकांची अदलाबदल झाली होती. प्रश्नपत्रिका बदलून दिल्या. विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्यात आला. अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हा शल्यचिकित्सक अनिल माळी यांनी दिली.
औरंगाबाद ३६ टक्के उमेदवार गैरहजर
औरंगाबादला दुपारच्या सत्रात १६ हजार ५९० उमेदवार परीक्षा देणार होते. सकाळच्या तुलनेत दुपारी उपस्थिती अधिक राहिली. एकूण १० हजार ४७६ जणांनी परीक्षा दिली, तर ३६ टक्के म्हणजे ६ हजार ११४ उमेदवार गैरहजर राहिले. औरंगाबादला एका केंद्रावर एका कोरोनाबाधित युवतीने पीपीई किट घालून परीक्षा दिली. औरंगाबादला परीक्षेसाठी कोणी नंदुरबार, कोणी परभणी तर कोणी जालन्याहून आले होते; पण परीक्षेची वेळ होईपर्यंत अनेकांना औरंगाबादेतील केंद्रेच सापडली नाहीत. गल्लीबोळातील केंद्र शोधताना अनेकांना मोबाइलमधील ॲपने गोल गोल फिरविले.
नाशिक उपसंचालक अहवाल देणार
विविध परीक्षा केंद्रांवर सकाळ सत्रात १७ हजार ३६८ व दुपारच्या सत्रात १८ हजार ३८५ असे एकूण ३५ हजार ७३५ उमेदवार प्रविष्ट झाले होते. यापैकी तब्बल १६ हजार ७४८ उमेदवारांनी परीक्षेला दांडी मारल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. काही केंद्रांवर प्रश्नपत्रिका उशिरा पोहोचल्याने गैरप्रकाराचा आक्षेप परीक्षार्थींनी नोंदविला. आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून परीक्षा नियोजन करणाऱ्या न्यासा संस्थेच्या ढिसाळ कारभाराविषयी शासनाला अहवाल सादर केला जाणार असल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी सांगितले.
आरोग्यमंत्री टाेपे यांनी राजीनामा घावा - भाजप
आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ उडाल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला. याला आरोग्यमंत्री राजेश टोपे हेच जबाबदार असून, त्याची जबाबदारी स्वीकारत टोपे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केली आहे.
काही उमेदवारांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. काही परीक्षा केंद्रांवर बसवलेले जॅमर कार्यान्वित नव्हते. त्यामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत शंका निर्माण होते.
- तानाजी तेलंग, उमेदवार, पुणे