संभ्रम, गैरसोय आणि मनस्ताप!

By admin | Published: November 10, 2016 02:05 AM2016-11-10T02:05:40+5:302016-11-10T02:05:40+5:30

दैनंदिन व्यवहारातून ५०० आणि १००० च्या नोटा बंद झाल्याने पुणे जिल्ह्यातील सामान्यांचे आज रोजच्या साध्या साध्या गोष्टींत खूप हाल झाले. सकाळपासून संभ्रम

Confusion, inconvenience and disillusionment! | संभ्रम, गैरसोय आणि मनस्ताप!

संभ्रम, गैरसोय आणि मनस्ताप!

Next

पुणे : दैनंदिन व्यवहारातून ५०० आणि १००० च्या नोटा बंद झाल्याने पुणे जिल्ह्यातील सामान्यांचे आज रोजच्या साध्या साध्या गोष्टींत खूप हाल झाले. सकाळपासून संभ्रम, गैरसोयी आणि मनस्ताप अशा अवस्थांतून लोकांना जावे लागले.
आज बँका आणि एटीएम बंद असल्याने लोकांचे हाल झाले. बहुतेकांनी आदल्या रात्री एटीएममधून पैसे काढून ठेवलेले होते परंतु त्या नोटा ५००-१०००च्याच असल्याने दैनंदिन व्यवहारात त्या नोटांना सगळीकडे नकारच मिळत होता. सुरुवात झाली ती पेट्रोलपंपापासूनच. पेट्रोलपंपावर तरी सुट्टे मिळतील या आशेपायी लोकांनी सकाळपासूनच भल्यामोठ्या रांगा लावल्या. पण हुशार पंपचालकांनी सकाळपासूनच ५००-१०००च्या नोटा स्वीकारणार नाही याच्या प्रिंटआऊटच लावून टाकल्या होत्या. भरायचे तर ५०० चे भरा १०० चे सुट्टे मिळणार नाहीत असा पवित्रा बहुतांश चालकांनी घेतलेला होता. त्यामुळे काही ठिकाणी चालकांशी ग्रामस्थांची हुज्जत होण्याचे प्रकारही घडले.
रोजची भाजी, हॉटेलातील नाश्ता, बाहेरचे जेवण, साध्या साध्या गोष्टींची खरेदी, किराणासामान घेणे या सगळ््या गोष्टींना मर्यादा आल्या होत्या आणि १०० च्या नोटा मर्यादीत असल्याने लोकांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांनाही याचा चांगलाच फटका बसला. मंचर, चाकण, इंदापूर, बारामती, पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या प्रवाशांना सुट््या पैशांच्या अडचणीने आणि पाचशे-हजारच्या नकाराने हैराण करून सोडले. रिक्षाने जायचे म्हटले तरीही सुट्ट्याची अडचण आ वासून उभी होतीच.
सराफ बाजारामध्ये सराफी व्यावसायिकांनी हुशारीने आज दुकाने बंद ठेवली अथवा फक्त सोने खरेदी सुरू ठेवली. सोन्याचे ३९ हजारांवर भाव गेल्याने सराफांची मात्र 'चांदी' झाल्याचे चित्र होते. पुणे नगर, पुणे सोलापूर व पुणे सातारा महामार्गावरील ढाबे, हॉटेल्स या ठिकाणी देखील ग्रामीण भागातील लोकांना पुष्कळ त्रास सहन करावा लागला. लांबचा प्रवास करणाऱ्या ट्रकचालकांनाही ढाब्यावर जेवण मिळणे अवघड होऊन बसले. सरदवाडी सारख्या कायम 'हाऊसफुल्ल' असणाऱ्या हॉटेलातही आज टेबले रिकामी दिसत होती.

बाजारपेठांमध्ये शुकशुकाट़़!
शिक्रापूर : तालुक्यातील मोठ्या बाजारपेठा असलेल्या शिक्रापूर, पाबळ, तळेगाव, सणसवाडी, कोरेगाव आदी भागांत आज दिवसभर ५०० व १००० च्या नोटा चलनात आणण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात दुकानदारांना हैराण केले. तर, दुकानदारांकडे देखील सुट्टे पैसे नसल्याने अनेक ठिकाणी व्यवहार ठप्प झाले.
किराणा दुकानदार, कापड, जनरल स्टोअर्स, हॉटेल व्यावसायिक, त्याचबरोबर सोनार, पीठ गिरणी, मेडिकल स्टोअर्स, हॉस्पिटल त्याचबरोबर आठवडे बाजार व छोटे-मोठे दुकानदारांना आज दिवसभार ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर ५०० व १००० च्या नोटा व्यवहारात आल्या. किरकोळ दुकानदारांना याचा मोठा फटका बसला असून, मालाची देवघेव करताना रोजच्या उलाढालीत ७० टक्के फरक पडला. अनेक दुकानदारांनी सुट्या पैशाअभावी ग्रहकांना माल दिला नाही. त्यामुळे ग्राहकांचीदेखील मोठ्या प्रमाणावर हेळसांड झाली. या भागातील पेट्रोलपंपावर मोठ्या प्रमाणावर गर्दी सकाळपासूनच सुरू होती. यात ९० टक्के ग्राहकांनी ५०० ते १००० च्या नोटा देणे पसंत केले. आपल्या जवळील नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केला. त्यातच दिवसभर बँक व्यवहार बंद असल्याने छोटे-मोठे व्यवहार करताना सर्वसामान्य नागरिकांची धांदल उडाली. शिरूर तालुक्यातील औद्योगीकरणामुळे दर महिन्याला कोट्यवधी रुपयांची उलाढाल या भागात होत असते. त्यात मोठ्या प्रमाणावर ५०० व १००० च्या नोटा चलनात येत असतात. येत्या आठवडाभरात ‘नोटा बंदचा’ मोठा फटका या भागात होणार असल्याचे अनेक व्यापाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.


प्रतीक्षा बँक सुरू होण्याची
अनेकांना ५०० ते १००० च्या नोटा बंद झाल्या असल्याने आपल्या जवळील असलेल्या नोटा बाजारात वटवण्यासाठी विनाकारण धावपळ केली
तर या भागातील सुमारे ३० टक्के श्रीमंत लोकांनी बँक व्यवहार सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर उलाढाल या भागात होणार आहेत़
यासाठीच आतापासूनच अनेकांनी आपले मित्र, नातेवाईक व काही एजंट शोधून जवळील ५०० व १००० च्या नोटा वटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.

Web Title: Confusion, inconvenience and disillusionment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.